वृक्षारोपण करून नववधू बोहल्यावर…

बोरगाव येथे आगळावेगळा विवाह सोहळा
नागठाणे (प्रतिनिधी) – विवाहाचा सोहळा संस्मरणीय ठरावा अन्‌ वृक्ष लागवडीला, पर्यावरणाला गती लाभावी. या जीवनाच्या अनमोल क्षणांत अर्थपूर्णता भरताना बोरगाव (ता. सातारा) येथे आज आगळा उपक्रम राबविण्यात आला. त्यात नववधूच्या हस्ते बोहल्यावर चढण्यापूर्वी वृक्षारोपण करण्यात आले. या आगळ्या विवाहाचे परिसरातून कौतुक होत
आहे.

बोरगाव येथील मोनिका दत्तात्रय साळुंखे हिचा आज विवाह होता. मोनिका ही गावातील धनाजी जाधवराव प्रतिष्ठानची अध्यक्षा आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ती विविध सामाजिक उपक्रमांत कार्यरत असते. विवाहाचे औचित्य साधताना आज सकाळी आठ वाजता तिच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय ढाणे तसेच सरसेनापती धनाजी जाधवराव प्रतिष्ठानचे अमरसिंह जाधवराव, उमेश वाघ, मयुरी साळुंखे, डॉ. विनायक साळुंखे, गजानन साळुंखे, निखिल साळुंखे, राजेंद्र साळुंखे, सुमीत साळुंखे, अक्षय सांळुखे, ओंकार साळुंखे आदी उपस्थित होते.

विवाहाचा सोहळा संस्मरणीय ठरावा अन्‌ वृक्ष लागवडीला, पर्यावरणाला गती लाभावी हा या आगळ्या उपक्रमामागील हेतू असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या दत्तात्रय ढाणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आकारास आला. गावात ज्या वधूचा विवाह असेल तिच्या हस्ते झाड लावून पुढील विवाह विधींना सुरुवात केली तर वृक्षारोपण चळवळीला गती लाभेल, असे श्री. ढाणे यांनी सांगितले. ही झाडे गावातील मुख्य रस्ता, सार्वजनिक परिसर, शाळा, अंगणवाडी परिसरात लावण्यात येत आहेत. श्री. ढाणे स्वतः जातीने या झाडांची निगा राखत असतात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)