नवी दिल्ली- करोना बाधित असलेल्या व्यक्तीला कधी रुग्णालयात दाखल करावे याची लक्षणं आणि धोक्याची सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केली आहेत.
गृह विलगिकरणात असणाऱ्या बाधितांची ऑक्सिजन पातळी घसरत असेल किंवा त्याच्या छातीत दुखत असेल तर तातडीने रुग्णालयात दाखल करावे. ऑक्सिजन पातळी 93 च्या खाली आली असेल तर प्रचंड थकवा आणि अशक्तपणा किंवा छातीत दुखत असेल तर गृह विलगिकरणात असलेल्या रुग्णाला रुग्णालयाच्या मदतीची गरज लागणार आहे हे स्पष्ट आहे. अशा रुगणांनी डॉक्टरांच्या संपर्कात राहावे तसेच सहव्याधी असणाऱ्या रुगणांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले. आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार, जर सौम्य लक्षणे असलेल्यानं श्वसनाचा त्रास होत असेल तर वैद्यकीय मदत तातडीने घेतली पाहिजे.
जर खूप ताप किंवा प्रचंड खोकला पाच दिवसांपेक्षा अधिक काळ असेल तर तातडीने त्यांनी आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात राहिले पाहिजे. ज्यांचा श्वसनाचा वेग प्रतिमिनिट 34 पेक्षा अधिक आहे आणि श्वासनास त्रास होत असेल तसेच ऑक्सिजन पातळी 90 ते92 च्या दरम्यान असेल त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल व्हावे. ज्या रुग्णांना तीव्र संसर्ग झाला आहे आणि श्वसनाचा दर प्रतिमिनीट 30 पेक्षार जास्त आहे ज्यांना श्वास घेणे अवघड होतं आहे त्यांनी अतिदक्षता विभागात दाखल व्हावे असे सुचवण्यात आले आहे.