निसर्ग कोपतो तेंव्हा…

निसर्गाचे बदलते चक्र पाहिले की वाटते या एकंदरीत स्थितीला माणूस स्वत: जबाबदार आहे. मग याला एकही नैसर्गिक आपत्ती अपवाद नाही. माणसाने निसर्गाचा अधिकाधिक वापर करून घेतला मात्र, त्या बदल्यात त्याला वापस म्हणावे अशी परतफेड केली नाही. माणूस आज निसर्गात जातोय, तिथे बऱ्यापैकी रमतोय मात्र यामागे कारण आहे, त्याच्या समाज माध्यमावरील वावरासाठी त्याला स्वत:च्या सुंदर सुंदर प्रतिमा हव्यात!

एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे महापूर अशी सध्या राज्याची स्थिती आहे. विस्थापित होणाऱ्या लोकांची वाढणारी संख्या यामुळे शहरावरील ताण वाढतोय! ग्रामीण भागात जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे लोक शहराकडे ओढावले जाताहेत. लोकसंख्येच्या भस्मासुरामुळे अगणित समस्या आपल्या पुढे निर्माण झाल्या आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मुंबईच्या दैनंदिन जगण्यातील वाढत जाणारा संघर्ष.

सामान्य नागरिक, एनडीआरएफ, एसडीआरएफ, प्रशासकीय यंत्रणा हे सगळे आपल्या जीवाची बाजी लावत पूरग्रस्त नागरिकांचे प्राण वाचवीत आहेत. पण यामध्ये मुक्‍या प्राण्यांचे प्रचंड हाल आहेत. मराठवाड्यात पाणीपातळी एक हजार फुटाच्या खाली गेली आहे. आज भर पावसाळ्यात तिथे टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट बनत आहे तर जनावरांना सांभाळणे मुश्‍कील झाले आहे.

नियमाला बगल देऊन केले जाणारे अनधिकृत बांधकाम आणि रस्त्यांच्या निर्मितीसाठी निसर्गाशी खेळले जातेय. विकास हा शाश्‍वततेच्या मार्गावरून मार्गक्रमण करणारा असावा! निसर्गाशी प्रतारणा करून विकास केला गेला तर निसर्ग कोपल्याशिवाय राहत नाही.

सांगली, कोल्हापूर, सातारा, गडचिरोली, नाशिक, पुणे, मुंबई याठिकाणी निर्माण झालेल्या अस्मानी संकटाला सामोरे जाण्यासाठी असलेली आपत्ती व्यवस्थापनाची व्यवस्था तोकडी असल्या कारणाने असंख्य लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. नागरिकांची आयुष्यभराची कमाई पाण्यात गेली आहे. असंख्य गावे उद्‌ध्वस्त होवून संसार मोडकळीस पडले आहेत.

प्रशासन आपली भूमिका निभावण्यासाठी कमी पडत आहे, हे जरी खरे असले तरी नागरिकांनी किमान काही गोष्टींचे भान बाळगणे आवश्‍यक आहे. मुंबईत समुद्राच्या भरतीमध्ये दोनशे पेक्षा अधिक मेट्रिक टन कचरा समुद्र सपाटीवर आला. किमान आपण स्वत: स्वच्छ राहत, सार्वजनिक स्वच्छतेबद्दल कटिबद्ध राहिलोत तरी असंख्य आपत्तींना रोखता येऊ शकेल.

जातीधर्माच्या बाहेर पडून माणुसकी धर्म निभावित अगणित नागरिक या अस्मानी संकटामध्ये एकत्र येत मदत करीत आहेत. मात्र, प्रत्येकवेळी आपल्याला एकत्र येण्यासाठी नैसर्गिक आपत्तीच का लागते, हे कळण्यास मार्ग नाही. इलेक्‍शन मोडवर असणारे राजकीय नेत्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. विशेष म्हणजे सामान्य नागरिक आणि त्यांच्या समस्या त्यांच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट नाहीत. सामान्य नागरिक कायम अडचणीत राहिला पाहिजे, यासाठी एक समांतर व्यवस्था काम करीत असते. कारण या व्यवस्थेला हे चांगले माहिती आहे की, जर या नागरिकांचे प्रश्‍न आपण कायम मार्गी लावले तर हे आपल्याला पुन्हा विचारणारच नाहीत!

समकालीन स्थितीमध्ये नागरिकांनी स्वत: जागृत राहत, निसर्गाचे वैभव जपत, राजकीय भान राखत आपला माणुसकी धर्म निभवावा! तरच आपण निसर्गा संगे नांदू या सौख्यभरे म्हणू शकू!

– श्रीकांत येरूळे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)