तहसील कार्यालयाच्या इमारतीला मुहूर्त कधी?

कामकाजात सुसूत्रतेचा अभाव : नागरिकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरसोय

वडगाव मावळ  – मावळ तहसील कार्यालयाला सुसज्ज इमारत नसल्याने अपुऱ्या जागेत ब्रिटिशकालीन इमारतीत कार्यालय सुरू आहे. विविध विभागांची वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालये असल्याने कामकाजात सुसूत्रतेचा अभाव पहायला मिळत आहे.

कार्यालयांमुळे काही कार्यालये इतरत्र भाड्याच्या खोलीत असल्याने अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये वसलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या भैतिक साधनसुविधा उपलब्ध असलेल्या पुणे-मुंबई दोन महानगराच्या मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्‍यातील जमिनीला सोन्याच्या किंमती आल्या आहेत. त्यातच लोणावळा – खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण असून महाराष्ट्रासह देशातील धनिकांनी जमीन व जागा खरेदी केल्या आहेत.

मावळ तहसील कार्यालय वार्षिक शासनाला एकूण 30 कोटी रुपयांचा महसूल जमा करून देते. या कार्यालयात तहसीलदार कार्यालय, निवासी नायब तहसीलदार कार्यालय, महसूल नायब तहसीलदार कार्यालय, निवडणूक नायब तहसीलदार कार्यालय, संजय गांधी निराधार शाखा, शिधा पुरवठा, अभिलेख कक्ष, कुळ कायदा शाखा, नागरी सुविधा केंद्र आदी कार्यालय ब्रिटीश कालीन इमारतीच असून ही जागा अपुरी आहे. त्यातच दुय्यम निबंधक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कृषी कार्यालय, सामाजिक वनीकरण, विद्युत विभाग, पोस्ट कार्यालय, मंडलाधिकारी व तलाठी कार्यालय इतरत्र असल्याने नागरिकांना शोधण्यासाठी वेळ वाया जात आहे. तहसील कार्यालयाच्या जागेत पोलीस ठाण्याचे अतिक्रमण असून त्यांची स्वतंत्र 9 गुंठे जागा असून त्यावर अतिक्रमण आहे.

मावळ तहसील कार्यालयात दैनंदिन हजारो नागरिकांची वर्दळ असते, त्यातच आंदोलने, मोर्चे, निवडणूक मतमोजणी तसेच आदी कार्यक्रम होत असल्याने वाहनांची पार्किंग व्यवस्था कोलमडल्याने वाहतूक कोंडी होते. मावळ तहसील कार्यालयाची सुसज्ज इमारत उभी करून विखुरलेले कार्यालय एकत्रित आणून अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची गैरसोय रोखण्यात यावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, दत्तात्रय शेवाळे, अतुल वायकर, आशिष खांडगे, अनिकेत भेगडे, सोमा भेगडे आदींनी केली.

तहसील कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव तत्कालीन तहसीलदार शरद पाटील यांच्या काळात मंत्रालयात सादर केला आहे. इमारतीबाबत पाहणी झाली असून निधी उपलब्ध झाल्यास इमारतीचे बांधकाम सुरु होईल.
– रणजीत देसाई,
तहसीलदार, मावळ.

ब्रिटिशकालीन धोकादायक कार्यालयात कारभार
पावसाळ्यात मावळ तहसील कार्यालयाच्या इमारतीतील अनेक कार्यालयात पावसाचे गळती होत असल्याने कागदपत्रे भिजण्याच्या घटना घडत आहेत. मावळ पंचायत समितीची सुसज्ज इमारत झाल्याने पंचायत समितींच्या कार्यालयात सुसूत्रता आली आहे. मावळ तहसील कार्यालयाची इमारत ब्रिटिशकालीन असून काही भाग धोकादायक झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते अतुल वायकर म्हणाले मावळ तहसील कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीबाबत स्थानिक आमदारांनी लक्ष देऊन प्रश्‍न सोडविणे काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)