पुणे : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागातील विविध कार्यालयातील संचालकांमध्ये काहीना काही कारणास्तव खांदेपालट होणार आहे. खांदेपालटासाठी काही संचालकांनीही जोरदार हालचाली सुरु केलेल्या आहेत. आता शासन संचालकांच्या खांदेपालटासाठी कधीचा मुहुर्त साधणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, योजना शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील कार्यरत आहेत. या संचालकांचा संबंधित कार्यालयात बराचसा कालावधी पुर्ण झालेला आहे. यातील एका संचालकाने प्राथमिक शिक्षण संचालकपदी बदलीने नियुक्ती मिळावी यासाठी शालेय शिक्षण विभागाला पत्रही दिले आहे. काही संचालकांच्या कामकाजाबाबत वरिष्ठांचा नाराजीचा सूरही आहे. यामुळे संचालकांचे खांदेपालट होणार असल्याची चर्चा आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील संपत सुर्यवंशी यांची प्रतिनियुक्तीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. सुर्यवंशी यांची नियुक्ती तीन वर्षासाठी करण्यात आली असून त्यातील एक वर्षाचा कालावधी पुर्ण झालेला आहे. मात्र ते बदली करुन पुन्हा मंत्रालयात जाण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. सद्या ते एक महिन्याच्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ.महेश पालकर यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयाच्या कामकाजाची घडी बसविण्यात फारसे यश अद्यापही कोणत्याच संचालकांना मिळालेले नाही. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. यामुळे काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामकाजाबाबत काहीच शिस्त राहीलेली नाही. अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत अनेकदा गायब होत असल्याचे आढळुन येते. विविध प्रकरणे मुदतीत मार्गीच लागत नाहीत. फायली गहाळ होतात. प्रकरणे जाणुनबुजून काही तरी अपेक्षेने प्रलंबित ठेवली जातात. अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे टेबलही बदलले नाहीत. यामुळे ठराविक कर्मचाऱ्यांची मक्तेदारीही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) संचालकपदी आयएएस अधिकारी राहुल रेखावार यांची चार महिन्यापुर्वी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचेही विद्या प्राधिकरणाच्या कामकाजात फारसे मन रमत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांचीही बदली होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.