आई अशी असते कधी?

माझी मुलगी किमया काही आजारपणाच्या तक्रारींमुळे पुण्यातल्याच एका खासगी हॉस्पिटलमध्ये काही दिवस ऍडमिट होती. हॉस्पिटलमधे अशा प्रकारे इतके दिवस राहण्याचा पहिलाच प्रसंग! किती प्रकारचे पेशंट, त्यांचे नातेवाईक खूप जवळून पाहिले, वाटले बापरे असे पण लोक असतात?
हॉस्पिटलमध्ये खूपच पेशन्टस ऍडमिट असल्यामुळे तिथे आम्हाला वेगळी रूम मिळाली नाही. दोन दिवसांत व्यवस्था होईल असे सांगण्यात आले. थोडेसे नाराज होत, प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आहे त्या रूममधे आम्ही शिफ्ट झालो.

तिथे आमच्या आधी एक चार वर्षांचा अत्यंत गोड मुलगा, त्याची आई-वडील असे तिघे होते. आई-वडील गेले की, आजोबा येऊन बसत, पण तो मुलगा आजोबा असताना खूप बोलायचा, आनंदी दिसायचा आणि आई-वडील असले की मोठ्या मनासारखा समंजस व्हायचा, शांततेत सगळे करून घ्यायचा, ना कशाचा हट्ट की रडणे. माझी मुलगी किमया तर मला एक क्षण ही दूर होऊ देत नव्हती की तिच्या बाबांनाही. मला त्या छोट्या मुलाचे आश्‍चर्य वाटू लागले. शेवटी त्यांच्याशी चांगली ओळख झाल्यावर आजोबांना कौतुकाने विचारले, तर त्यांनी सांगितलेली माहिती थक्क करणारी होती.

त्या मुलाचे वडील एक वर्षापूर्वीच वारले होते. आईने हट्टाने सहा महिन्यांतच दुसरे लग्न केले. सासऱ्यांना, मुलाला आणि तुम्हाला अजिबात आता सांभाळणार नाही असे सांगून ती त्या माणसासोबत निघून गेली. आज मुलगा इतका आजारी आहे म्हणून केवळ नाईलाजाने, आजोबांनी त्या दोघांना बोलावले. कारण आजोबांचे वय 65 वर्षं; घरी दुसरे कोणीच नाही. मग घरी जाऊन स्वयंपाक करून येईपर्यंत त्या मुलाच्याजवळ कोणी हवे म्हणून यांना बोलावले होते.

दोघे नवरा-बायको उपकार केल्यासारखी येत होती. आजोबा हे सांगत होते त्यावेळी त्या चार वर्षांच्या मुलाने कानावर हात ठेवले होते. शेवटी “आजोबा एक शब्दही सांगू नका,’ म्हणून जोरात ओरडला.
पण आजोबाच्या डोळ्यातील पाणी पाहून मला अक्षरशः रडू आले. तसेच उठले अन्‌ त्या मुलाला घट्ट जवळ घेतले. काही क्षणात त्याच्याशी मैत्री झाली, त्यानंतर ते दोघे जणू आमची फॅमिलीच झाले.

सारखे “मावशी माझ्याजवळ ये ना, माझ्याशी खेळ ना, मावशी चल आपण फोटो काढू ,’ म्हणत त्यानं खूप फोटो काढायला लावले. खूप हसला होता खूप सुखावला होता. त्याची आई जवळ बसलेली असली, तरी मीच पाहिजे होते त्याला. आजोबा फार सुखावून गेले. आम्ही दुसरी रूम घेण्याचा विचार डोक्‍यातून काढून टाकला. हॉस्पिटलमधून परत येताना त्याचे डोळे भरून येऊ लागले. सारखा “नका जाऊ’ म्हणतं होता. त्याला झोप लागल्यावर आम्ही निघालो डोळे भरून येत होते, त्याच्या आई-वडिलांची परवानगी घेऊन त्याला झोपेतच जवळ घेतले.

खरंच किती हतबल असतो आपण काही वेळेला. डोळे पुसले अन्‌ किमयाला घेऊन घरी आले. आल्यापासून रोज एकदा तरी त्याचे फोटो पाहते. देव त्याचे भलं करो. पण आई अशी असू शकते? इतकी स्वार्थी? लग्न केले ठीक आहे; पण लेकरू सोडून जाण्याची हिम्मत कशी झाली असेल तिची? इतके कठोर मन कसे असेल? दुसरे लग्न केल्यापासून एकदाही तिला आपल्याच मुलाला भेटावेसे वाटले नसेल का? बरं त्या बाईचा नवरा बरा म्हणावा, निदान त्या मुलाला अनेकवेळा मांडीवर घेऊन गप्पा तरी मारत होता; पण ही अगदी कंटाळून गेल्यासारखी त्याला ओरडत होती कमाल वाटली.
कठीण आहे सगळेच!

– मनीषा संदीप

Leave A Reply

Your email address will not be published.