कोंडीस कारण ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई कधी?

देहूरोडमध्ये अनेक नादुरुस्त वाहने रस्त्यावरच

देहूरोड – देहूरोड मेन बाजार पेठ, उड्डाणपूल, सेवा रस्ता तसेच परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर नादुरुस्त, कालबाह्य वाहने तसेच व्यापाऱ्यांची 24 तास उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच बाब होत आहे. अशा वाहनांमुळे दुर्घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने अशा वाहनांवर कारवाई होणार का? असा सवाल नागरिक करीत आहे.

देहूरोड मेन बाजार पेठ तसेच अंतर्गत रस्त्यांवर आणि उड्डाणपुलाखाली नादुरुस्त कालबाह्य वाहने तसेच व्यापाऱ्यांची वाहने दुकानांसमोरील रस्त्यांवर 24 तास उभी राहत आहे. बाजार पेठेतील वाहनांमुळे वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. त्याचबरोबर उड्डान पुलाखाली असणाऱ्या वाहनांमुळे जागा अडवली जात आहे. नागरिकांनी बांधकाम करताना आपल्या जागेत वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करणे गरजचे असते, परंतु तसे न करता संपूर्ण जागा वापरात घ्यायची आणि वाहने रस्त्यांवर पार्क करायची, अशी स्थिती आहे. आता जागाच उपलब्ध नसल्याने वाहनतळाचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे.

लोहमार्ग पूल ते गुरुद्वारा दरम्यान तयार करण्यात आलेल्या नवीन उड्डाण पुलाखाली बेवारस पद्धतीने उभ्या वाहनांनी जागा अडवली आहे .या वाहनांमुळे अडथळे निर्माण होत आहे. तसेच कशाही पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांमुळे तसेच रस्ता वाहतुकीसाठी खूपच अरुंद होत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून एखाद्या वाहनाचा गुन्ह्यात वापर करुन रस्त्यावर सोडली जात असल्याने बेवारस पडलेल्या वाहनांची तपासणी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता शहरवासी करु लागले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.