घर खरेदी करणे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी एखादा महाल खरेदी करण्यासारखे असते. ही खरेदी वारंवार होत नाही. त्यामुळे घर खरेदीचा व्यवहार काळजीपूर्वक करावा लागतो. या व्यवहारात घाई केल्यास नुकसान पदरी पडू शकते. त्यामुळे काही गोष्टींचे आकलन करणे गरजेचे आहे.
- घराजवळच्या वातावरणाचा आढावा घ्या. आपल्या परिसरात प्रदूषणाचे प्रमाण अधिक तर नाही ना? याची खातरजमा करुन घ्या. घराजवळ गार्डन, मोकळे मैदान आदींची सुविधा देखील पाहणे गरजेचे आहे.
- फ्लॅट आणि कामाचे ठिकाण यात फार अंतर असू नये. शाळा आणि कॉलेजला देखील सहजासहजी जाता येईल, अशा ठिकाणी घर खरेदीचा विचार करावा. घराजवळ बसस्टॉप आहे की नाही हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.
- जर आपण स्वत:च घराचे बांधकाम करत असाल तर आपल्या प्रस्तावित घराजवळ किती घर तयार आहेत किंवा होत आहेत, याबाबत माहिती मिळवावी. तसेच परिसरातील नागरी सुविधांबाबतचेही आकलन करावे.
- जर आपण भूखंड किंवा फ्लॅट खरेदी करत असाल तर तो वादात तर नाही ना? याचीही तपासणी करावी. घर खरेदीचा निर्णय करताना वकिलामार्फत घराच्या कागदपत्रे तपासून घ्यावीत. त्यानंतरच पुढचा विचार करावा.
- नवीन घर आपल्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणारे आहे की नाही हे पाहवे. खोलीची संख्या, आकार, स्वयंपाकघर, शौचालय, गॅलरी, ड्राय बाल्कनीची रचना पाहवी. एवढेच नाही तर नवीन फ्लॅट कोणत्या मजल्यावर आहे, याबाबतही माहिती घ्यावी.
- घराला होणारा विजपुरवठा, पाणी, सांडपाण्याची व्यवस्था याबाबतही चौकशी करावी. पाण्याच्या चोवीस तास सुविधेबाबतही जाणून घ्यावे. वॉटर पंम्पबाबतही माहिती मिळवावी.
- बिल्डरकडून घराचे बांधकाम करुन घेत असाल तर आपल्या गरजेनुसार घराच्या आकारमानात बदल करुन घ्यावा.
- घराचा ताबा घेण्यापूर्वी खिडकी, दरवाजे, नळ, फ्लश, रंगरंगोटी वीजपुरवठ्याची स्थितीची तपासणी करावी.
- घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला आहे, हे पाहवे. सूर्यप्रकाश घरात येतो की नाही, याचेही आकलन करावे. घर बुक करण्यापूर्वी सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेला गृहकप्रकल्पाला भेट द्यावी, जेणेकरून घरातील प्रकाशाचा अंदाज घेता येईल.
– जगदीश काळे