बाइट डान्स कंपनीला घरघर

भारतातील कर्मचारी भरती कंपनीने थांबविली 

नवी दिल्ली – टिकटॉक ऍप निर्माती कंपनी बाईट डान्सच्या जगभरातील कामकाजावर परिणाम होत आहे. भारतात या कंपनीचे 2 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आता काम बंद झाल्यामुळे कंपनीने नियोजित भरती रद्द करून टाकली आहे. त्याचबरोबर आहेत ते कर्मचारी ही कंपनी सोडून जात आहेत. 

कंपनीने अद्याप कर्मचाऱ्यांना कामावरून काढलेले नाही. मात्र कर्मचाऱ्यांना एकूण परिस्थितीचा अंदाज येऊ लागला आहे. दरम्यान, चीनबरोबर सरहद्दीवर संघर्ष निर्माण झाल्यानंतर भारताने जवळ जवळ 100 चिनी ऍपवर बंदी घातली आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी चिनी हे ऍप वापरण्यावर मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे बाईट डान्स अडचणीत आली आहे.

कंपनीने सध्या असलेल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या कामांमध्ये अदलाबदल केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय चीनमध्ये आहे. मात्र अनेक देशांमध्ये कंपनीची इतर कार्यालये कार्यरत आहेत. सध्याच्या परिस्थितीत कंपनी आपले मुख्य कार्यालय लंडनला हलविण्याच्या विचारत आहे. दरम्यान काही वृत्त माध्यमानी दिलेल्या वृत्तानुसार बाईट डान्स कंपनी भांडवलासाठी भारतातील रिलायन्स कंपनीबरोबर चर्चा करीत आहे. या माध्यमातून या कंपनीचे भारतातील काम वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. मात्र याबाबत दोन्ही कंपन्यांनी अधिकृत अशी माहिती जाहीर केलेली नाही.

अमेरिकेत कंपनी खरेदीसाठी प्रयत्न
अमेरिकन सरकारने टिकटॉक लवकरच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकेतील या कंपनीचे काम विकत घेण्यासाठी मायक्रोसॉफ्ट प्रयत्न करीत आहे. त्यानंतर आता समाजमाध्यम क्षेत्रातील अमेरिकन कंपनी ट्‌विटर ही कंपनी विकत घेण्याच्या शक्‍यतेवर विचार करीत असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेतील दहा कोटी लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.