नोव्हेंबरमधील पावसाने हंगाम महिनाभर लांबणीवर
पुणे – पंजाबनंतर गव्हाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे गव्हाचे नुकसान झाले. गव्हाचा हंगाम महिनाभर लांबणीवर पडल्याने सध्या बाजारात साठवणुकीतील गहू विक्रीस आणला जात आहे. किरकोळ तसेच घाऊक बाजारात गव्हाच्या भावात वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यात मध्य प्रदेशातील गव्हाची आवक सुरू होणार असल्याने तूर्तास ग्राहकांना जादा भावाने गहू खरेदी करावा लागणार आहे.
पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांत गव्हाचे मोठे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन घेतले जात असले, तरी वरील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील गव्हाचे उत्पादन कमी आहे. पंजाबमधील गहू उत्तरेकडील राज्यात तसेच पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर विकला जातो. देशाच्या उर्वरित भागात मध्य प्रदेशातील गहू विक्रीसाठी पाठविला जातो.
मध्य प्रदेशातील गहू लागवडीचे क्षेत्र मोठे आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिना संपल्यानंतरही मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रात पाऊस झाला. अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले तसेच प्रतवारीवर परिणाम झाला. सध्या बाजारात उपलब्ध असलेला गहू साठवणुकीतील असून शासकीय योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांनी गहू खरेदी केला आहे. या गव्हावर प्रक्रिया करून तो विक्रीस पाठविला जात आहे. प्रक्रिया केलेल्या गव्हाच्या भावात क्विंटलमागे 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली, अशी माहिती मार्केटयार्डातील गव्हाचे व्यापारी विजय नहार यांनी दिली.
गुजरात आणि मध्य प्रदेशाच्या तुलनेत महाराष्ट्रात गव्हाची लागवड तशी कमी आहे. मध्य प्रदेशातील गहू संपूर्ण देशात विक्रीसाठी पाठविला जातो. गव्हाची लागवड होण्यासाठी थंडी लागते. दव, धुके असल्यास गव्हाची वाढ उत्तम होते. यंदा नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे गव्हाच्या लागवडीवर परिणाम झाला. गव्हाचा हंगाम मार्च महिन्यानंतर सुरू होतो. अवेळी पावसाचा फटका मध्य प्रदेशातील गव्हाला बसल्याने तेथील गव्हाची आवक फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल. गुजरातधील गव्हाची आवक 15 फेब्रुवारीनंतर होण्याची शक्यता आहे, असे नहार यांनी सांगितले.