लोणी : इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे चालु रब्बी हंगामात गहू पीक घेतलेले शेतकरी अडचणीत दिसत आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना रविवारी (दि. 8) दिवसभर सूर्यदर्शनही होऊ शकते नाही.
सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे गहू पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकर्यांना वाटत आहे. तसेच सध्याचे ढगाळ वातावरण आणखी काही दिवस राहिल्यास गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली.तसेच ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिके व फळ बागा, हरभरा, करडई आदी पिकांवर किडी-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकर्यांमधून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रब्बीतील हंगामातील पिकांना थंडी पोषक ठरत असले तरी ढगाळ हवामानामुळे मात्र पिकांवर रोगराईचा प्रादुभाव वाढतो.सध्या गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा आदि पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आली असून पिके जोमात आली आहेत. कांद्याच्या रोपांचे तरवे तयार आहेत. काही ठिकाणी कांदा लागण सुरू आहे तर काही ठिकाणी पेरणी केलेला कांदा उगवून जोर धरू लागला आहे. पहाटे पडणारे धुके झाडण्यासाठी कांदा उत्पादकांची धांदल उडत आहे.
मात्र, मागील दोन दिवसांपासून वातावरणाचा नूर पालटला असून ढगाळ हवामान राहत आहे. ढगाळ हवामानामुळे कांद्याच्या पाती करपणे, गहू, ज्वारीची पानेदेखील पिवळी पडतात. तर मिरच्या, पालेभाज्यांवर तुडतुडी, पाने खाणा-या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाल्याने कीडनाशकांच्या फवारणीचा खर्च वाढणार आहे. सध्या थंडीचा कडाका कमी होऊन ढगाळ हवामानात वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम विविध पिकांवर होत आहे.
थंडी गायब
इंदापूर तालुक्यात काही भागात मंगळवारी (दि. 3) दुपारी रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांना ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरणाचा अनुभव आला. तसेच गेली तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे.