वाल्हे : मागील वर्षी पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याने पुरंदर तालुक्यातील वाल्हे व परिसरात गहू पेरा फक्त 32 हेक्टर क्षेत्रात झाला होता. यावर्षी काही भागांत पाणीसाठा उपलब्ध नुसार शुक्रवार (दि. 13) अखेर 83 हेक्टर क्षेत्रात गहू पेरा झाला असून, मागील वर्षापेक्षा सरासरी गहू पेरा 51 हेक्टर क्षेत्रात जास्त झाला असल्याची माहिती कृषी सहाय्यक गीता पवार, मयुरी नेवसे यांनी दिली.
मागील वर्षी वाल्हे व परिसरात मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस पडला नव्हता. यावर्षीही वाल्हे व परिसरात मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस अल्प प्रमाणात पडला होता. मात्र, पिंगोरी, कवडेवाडी खोरे, दौंडज खिंड तसेच सह्याद्रीच्या पर्वत रागांच्या परिसरात संततधार पाऊस पडल्याने वाल्हे गावातून वाहणा-या दोन्ही ओढ्यातून यावर्षी पाणी वाहिले होते. यामुळेच ओढा व परिसरातील विहिरी, बोअरवेल यांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली होती. यामुळेच मागील वर्षापेक्षा यावर्षी वाल्हे व परिसरात गहू पिकांचा पेरा वाढल्याचे दिसून येत आहे.
पेरणीला पोषक वातावरण असल्याने, व उपलब्ध पाणीसाठ्यावर यंदा रब्बी पिकांची पेरणी वाढली. मात्र, मागील काही दिवसांपासूनचे हवामान व पुढील दोन महिन्यांच्या हवामान अंदाजाने शेतकर्यांची चिंता वाढत आहे.अनेक भागात मागील काही दिवसांमध्ये थंडी गायब झाली होती. आता मात्र, पुन्हा थंडीचा कडाका वाढत असल्याने ही थंडी रब्बी पिकांना पोषक ठरणारी आहे.