“रात्री व्हॉट्सअप डाऊन होतं, पण बंगालमध्ये ५० वर्षांपासून विकास डाऊन”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला ममता बॅनर्जींवर निशाणा

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर भाजपा नेते तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जींवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान नुकतेच नरेंद्र मोदी यांनी व्हॉट्सअप डाउन झाल्याच्या मुद्द्यावरुन ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी रात्री १०.३० वाजल्यापासून जवळपास एक तासासाठी व्ह़ॉट्सअप डाऊन होते. प्रचारसभेदरम्यान नरेंद्र मोदींनी याचा उल्लेख करत पश्चिम बंगालच्या विकासाचा मुद्दा मांडला.

“तुम्हा सर्वांना माहिती असेल की रात्री व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ४० मिनिटांसाठी डाऊन होतं. प्रत्येकजण चिंतीत होता, एक तास त्यांना अडचण येत होती. बंगालमध्ये विकास, लोकांचा सरकारवरील विश्वास सगळं काही गेल्या ५० वर्षांपासून डाऊन आहे,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. “बंगालमध्ये ज्या पद्धतीने लोकांचं समर्थन मिळत आहे ते पाहता यावेळी राज्यात भाजपा सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट आहे. तुम्ही सर्व इतक्या मोठ्या संख्येने भाजपाला आशीर्वाद देण्यासाठी आलात हे माझं भाग्य आहे. यावरुन बंगालमध्ये यावेळी भाजपाचं सरकार येणार हे स्पष्ट आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

“बंगालने काँग्रेस, टीएमसी, डावे सर्वांना संधी दिली आहे. जर तुम्ही भाजपाला संधी दिली तर खरं परिवर्तन कसं असतं हे आम्ही दाखवून देऊ. काँग्रेस आणि डाव्यांनी केलेला विनाश तुम्ही पाहिलात. टीएमसीने तुमच्या स्वप्नांचा चुराडा केला. गेल्या ७० वर्षात तुम्ही प्रत्येकाला संधी दिलीत. पण आम्हाला पाच वर्ष द्या. आम्ही बंगालला ७० वर्षांच्या विनाशातून मुक्त करु. तुमच्यासाठी आमच्या जीवाचं बलिदान देऊ,” असं आश्वासन नरेंद्र मोदींनी यावेळी दिलं. “बंगालसाठी जर खऱ्या अर्थाने एखादा पक्ष असेल तर तो भाजपा आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.

“दीदी…बंगालने तुम्हाला काम करण्यासाठी १० वर्ष दिली पण तुम्ही हिंसाचार आणि गैरकारभार करत लोकांची फसवणूक केलीत,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. पुढे ते म्हणाले की, “दीदी म्हणतात खेळ संपला, पण सत्य हे आहे की विकास सुरु होणार आहे. दीदींचं सरकार राष्ट्रीय शिक्षण योजनाची अमलबजावणी करण्यास नकार देत आहे. त्यांना बंगालमधील तरुणांच्या भविष्याची चिंता नाही. आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो की, दीदींना बंगालमधील तरुणांच्या भविष्यासोबत खेळू देणार नाही”.

“जर आपण केंद्राच्या योजनांची अमलबजावणी केली तर लोक मोदींना आशीर्वाद देतील असं दीदींना वाटतं. अरे दीदी, जर तुम्हाला मोदींनी क्रेडिट द्यायचं नाही तर नका देऊ पण गरिबांचा हक्क का हिरावून घेता? येथे अनेक उद्योग मरणावस्थेत आहेत. फक्त एकच इंडस्ट्री सुरु आहे ती म्हणजे माफिया इंडस्ट्री,” अशी टीका मोदींनी यावेळी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.