नवी दिल्ली : व्हॉट्सऍपने प्रदीर्घ चाचणीनंतर अधिकृतपणे ‘कम्युनिटी’ फीचरची घोषणा केली आहे. व्हॉट्सऍपचे ‘कम्युनिटी’ फीचर हे त्याच्या ग्रुप्स वैशिष्ट्याचा विस्तार आहे. व्हॉट्सऍपचे कम्युनिटी फीचर वेबच्या बीटा व्हर्जनवर काही महिन्यांपूर्वी दिसले होते आणि आता कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. मात्र हे फीचर युजर्ससाठी कधी रिलीज केले जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चला तर, व्हॉट्सऍपचे कम्युनिटी फीचर काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे समजून घेऊया.
व्हॉट्सऍपचे कम्युनिटी फिचर
कम्युनिटी फीचरचा सर्वात मोठा फायदा असा आहे की तुम्ही 10 ग्रुप्स एकत्र करून एक कम्युनिटी तयार करू शकाल आणि त्यानंतर एका कम्युनिटीद्वारे तुम्ही एकाच वेळी सर्व (10) ग्रुप्सना मेसेज पाठवू शकाल. व्हॉट्सऍपचे हे कम्युनिटी फीचर शाळा, क्लब आणि कोणत्याही संस्थेसाठी खूप उपयुक्त ठरेल. सगळ्या ग्रुपचे एक डिस्क्रिप्शन असेल, जे सर्व वापरकर्ते पाहू शकतील.
याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की समुदायाशी जोडलेले सदस्य कम्युनिटीतील गट सदस्याचा फोन नंबर पाहू शकणार नाहीत, केवळ ऍडमिनला हा अधिकार असेल. ग्रुप ऍडमिनचे कम्युनिटीवर पूर्ण नियंत्रण असेल.
व्हॉट्सऍप ग्रुपप्रमाणेच कम्युनिटीमध्येही एक ऍडमिन असेल जो कोणत्या ग्रुपमध्ये कोण मेसेज करेल आणि कोण नाही हे ठरवेल. या व्यतिरिक्त, जर एखाद्या सदस्याने कम्युनिटी सोडली तर तो त्या कम्युनिटीशी जोडलेले इतर गट पाहू शकणार नाही. विविध प्रकारच्या गटांना एकत्र आणणे हा कम्युनिटी फीचरचा उद्देश आहे. सहसा वापरकर्त्याकडे किमान पाच गट असतात.
कम्युनिटी फीचरच्या आगमनाने, हे गट एकत्र व्यवस्थापित करणे सोपे होईल. कम्युनिटी फिचर एक प्रकारे ब्रॉडकास्टसारखेच असेल. कम्युनिटीत सामील झालेल्या वापरकर्त्यांकडे गैरवर्तनाची तक्रार करण्याचा, खात्याची तक्रार करण्याचा आणि समुदाय सोडण्याचा पर्याय असेल. संदेश आणि गटांप्रमाणे, कम्युनिटीदेखील पूर्णपणे एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतील.