बारामती (प्रतिनिधी) – कोरोना विषयक नागरिकांना संभ्रमित करणाऱ्या व भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले. त्यामुळे व्हाट्सअप ग्रुप ॲडमिनचे धाबे दणाणले आहेत. अनेक ॲडमिन आपले व्हाट्सअप ग्रुप बंद केले आहेत तर काही ग्रुपमधील सदस्यांनी ग्रुपच्या बाहेर उड्या मारल्या आहेत .
कोरोना विषयक संभ्रमित करणारे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करू नये असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे ,उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर तसेच पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील व अण्णासाहेब घोलप यांनी केले होते.
मात्र सोशल मीडियावर कोरोना विषयक संभ्रमित करणाऱ्या अफवा प्रसारित होत होत्या. अखेर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. बारामतीत भा.द.वी.कलम 188,504(2), 109,34 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005,कलम 52,54 प्रमाणे काहींवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी केलेली कारवाई पथ्यावर पडली. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होणारे अफवांचे प्रमाण कमी झाले. तसेच काही ग्रुप ॲडमिन नेग्रुप बंद केले तर काही ग्रुप सदस्यांनी ग्रूप मधून बाहेर पडणे पसंत केले.