व्हॉट्‌सऍप “सुधारणार’?( भाग १ )

महेश कोळी
सोशल मीडियाच्या स्पर्धेत सर्वाधिक लोकप्रिय ठरत असलेल्या व्हॉट्‌सऍपला सध्या फेक मेसेजीसच्या विळख्याने ग्रासले आहे. या फेक मेसेजीसमुळे सामाजिक तणाव वाढत चालला असून त्यातूनच मॉब लिंचिंगसारखे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे भारताने व्हॉट्‌सऍपला याबाबत एक प्रकारे तंबी दिली आहे. फेक मेसेजचे मूळ स्रोत शोधून काढण्यासाठी मार्ग काढा अशी सूचनाही केली आहे. मात्र, हे अत्यंत कठीण आहे. कारण इथे मुद्दा आहे तो युजर्सच्या खासगीपणाचा. युजरचा खासगीपणा जपण्यासाठी संपूर्ण संदेश इनक्रिप्टेड करण्यात येतो. म्हणजेच स्वत: व्हॉटसऍपला देखील कोणत्या संदेशात काय आहे आणि तो संदेश कोठून आला व कोठे गेला, हे देखील कळत नाही.
व्हॉट्‌सऍप ही सध्या भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेंजर सेवा आहे. या सेवेचे फायदे आणि तोटे आता समोर येत आहेत. म्हणूनच सरकारला सोशल मीडियाबाबत चौकट आखून देणे गरजेचे झाले आहे. याचाच एक भाग म्हणजे, भारत सरकारने व्हॉट्‌सऍपला तंबी देत जर काम करायचे असेल तर कोणत्याही फेक मेसेजचा मूळ स्त्रोत शोधून काढण्यासाठी तांत्रिक मार्ग काढा, असे सांगितले आहे.
त्याचबरोबर एक स्थानिक कंपनी स्थापन करण्याचीही सूचना दिली आहे. कायद्याचे पालन करण्याबरोबरच सोशल मीडियाचा दुरूपयोग थांबवण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे निर्देशही भारत सरकारने व्हॉट्‌सऍपला दिले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आणि व्हॉट्‌स कंपनीचे सीईओ ख्रिस डॅनियल्स यांच्यात अलीकडेच झालेल्या बैठकीत सोशल मीडियामुळे समाजात निर्माण होणाऱ्या तणावावर चर्चा झाली.
व्हॉट्‌सऍपला भारतात खूप लोकप्रियता आहे. शिक्षण असो किंवा केरळमधील पूरस्थिती असो, नागरिकांच्या मदतीसाठी व्हॉट्‌सऍप मोलाची मदत करत आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक त्याचा गैरवापर होताना दिसून येत आहे. मॉब लिंचिंग आणि रिवेंज पॉर्नसारख्या घटना घडत आहेत. व्हॉट्‌सऍपची बदनामी रोखण्यासाठी आणि गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी कंपनीला स्वत:च तांत्रिक उत्तर शोधावे लागणार आहे. कॅलिफोर्नियात असलेल्या व्हॉट्‌सऍप कंपनीचे सीईओ ख्रिस डॅनियल सध्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातून व्हॉट्‌सऍपमुळे भारतात निर्माण होणाऱ्या प्रश्‍नांचे त्यांनी आकलन केले आहे. अर्थात व्हॉट्‌सऍपने गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत, परंतु ते पुरेसे दिसून येत नाहीत.
गेल्या काही दिवसात देशात “मॉब लिंचिंग”च्या प्रकारात प्रचंड वाढ झाली आहे. याप्रकरणी अफवा पसरवण्यासाठी व्हॉट्‌सऍपच्या माध्यमाचा मोठा वापर करण्यात आला. तत्पूर्वी या माध्यमातून तणाव निर्माण करण्याचे कामही समाजकंटकांनी केले आहे. त्यानंतर देशात आपत्कालीन स्थितीत इंटरनेट सेवा बहाल करणाऱ्या कंपन्यांकडे सोशल मीडियावर तात्पुरती आणि तत्कालिक बंदी लागू करण्याच्या पर्यायांवर मत मागवले होते. काश्‍मीरमध्ये सोशल मीडियाचा वापर अशांतता निर्माण करण्यासाठीच केला जातो. म्हणून बहुतांश वेळा तेथे इंटरनेटवर बंदी घातली जाते. म्हणूनच व्हॉटसऍपने देखील अशा प्रकारच्या अप्रिय घटनांना पायबंद बसण्यासाठी काही बदल केले होते. त्यानुसार एखाद्याचा संदेश, फोटो किंवा व्हिडिओ हा फॉरवर्ड केला जात असेल तर त्यावर फॉरवर्ड असा शब्द येईल. त्यानुसार लक्षात येईल की, पाठवण्यात आलेला संदेश हा मूळ नाही आणि त्याने कोणाकडूनही तरी प्राप्त केला आहे. परंतु एवढ्या कार्यवाहीने अफवा थांबतीलच असे नाही.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)