WhatsApp Banned | इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने तब्बल 99 लाख भारतीय अकाउंट्स बंद केल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने 1 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025 दरम्यान हे अकाउंट्स बंद केले आहे. कंपनीच्या मासिक रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
वाढती फसवणुकीची प्रकरणं, स्पॅम आणि गैरप्रकारांवर कारवाई करण्यासाठी कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यूजर्सने प्लॅटफॉर्मच्या नियमांचे उल्लंघन केले तर अशाप्रकारची कारवाई पुढेही केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.
व्हॉट्सअॅपद्वारे माहिती तंत्रज्ञान नियमांतर्गत नियमितपणे अहवाल सादर केला जातो. या अहवालामध्ये यूजर्सच्या सुरक्षेच्या दिशेने कंपनीने घेतलेल्या निर्णयांबाबत माहिती देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपने माहिती दिली की, जानेवारी 2025 महिन्यात एकूण 99,67,000 भारतीय अकाउंट्स बंद करण्यात आली. तसेच, इतर यूजर्सकडून रिपोर्ट करण्याआधीच कंपनीकडून 13 लाखांपेक्षा अधिक अकाउंट्स बंद करण्यात आले.
जानेवारी 2025 मध्ये व्हॉट्सअॅपला एकूण 9,474 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 239 तक्रारींवर कारवाई करत संबंधित अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली.
अकाउंट्स बंद करण्याचे कारण काय?
एवढ्या प्रमाणात व्हॉट्सअॅप अकाउंट्सवर कारवाई करण्याचे कारण हे बल्क मेसेजिंग, स्पॅमिंग, फसवणूक, स्कॅममध्ये सहभागी असणे व चुकीची माहिती पसरवणे हे आहे. प्लॅटफॉर्म सुरक्षित आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून ही कारवाई करण्यात आली आहे.