राहुल गांधी आता नेमके काय करणार? (अग्रलेख)

कॉंग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आणि कॉंग्रेस कार्यकारिणी त्यांचा राजीनामा फेटाळून नेहमीची औपचारिकता पूर्ण करणार अशी एक संभावना होती. त्यानुसार हे सारे घडलेही; पण यावेळी मात्र राहुल गांधी हे खरच राजीनामा देण्यावर ठाम आहेत हे जसे कॉंग्रेस धुरंधरांच्या लक्षात आले तेव्हा मात्र सध्यापेक्षा बिकट पेचप्रसंग कॉंग्रेसपुढे निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी काल अहमद पटेल आणि के. सी. वेणुगोपाल गेले होते. आज सकाळी प्रियांका गांधी आणि अशोक गेहलोत यांनीही त्यांची भेट घेतली. पण राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम आहेत, असे सांगण्यात येते. त्यातच त्यांनी केवळ मीच नाही तर आता प्रियांका गांधी किंवा सोनिया यांही पक्षाध्यक्ष होणार नाहीत, असे सांगून त्यांनी पेच आणखीनच गडद करून ठेवला आहे.

आता खरे म्हणजे राहुल नसतील तर प्रियांका गांधी यांच्यासारख्या वेगळ्या करिष्म्याच्या नेत्यांचा पक्षाला उपयोग होऊ शकतो; पण राहुल यांनी त्यांचेही दार बंद केले आहे. त्यांची या मागची भूमिका मात्र अनाकलनीय वाटते. त्यांनी प्रियांकांचा मार्ग रोखण्याचे कारण नाही, असे त्यांना पक्षाच्या अन्य नेत्यांकडून सांगितले जाईल. मुळात राहुल गांधी यांना एकट्यालाच वाव देण्यासाठी स्वतः प्रियांकांनी आतापर्यंत मागे राहणे पसंत केले होते.

उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीने कॉंग्रेसला टाळून परस्पर आघाडी केल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून प्रियांकांना राजकारणात अगदी शेवटच्या क्षणी आणले गेले. तरीही त्यांचा वावर पूर्व उत्तर प्रदेशपुरताच मर्यादित ठेवला गेला. तिथेही प्रियांकांनी राहुल यांच्यासाठी पडती भूमिका घेतली. आता तर राहुल यांनी आपल्या नंतर त्यांचाही कॉंग्रेस अध्यक्षपदाचा मार्ग परस्परच बंद करून टाकला आहे, असे दिसते आहे. अर्थात याला कॉंग्रेस पक्षावर सातत्याने होत असलेला घराणेशाहीच्या आरोपाचीही पार्श्‍वभूमी असल्याने राहुल यांनी गांधी घराण्याबाहेरचाच अध्यक्ष करण्याचा आग्रह धरला असावा. त्या अर्थाने त्यांची ही भूमिका योग्य असेलही; पण पक्षात ती कितपत मान्य होईल हे पाहावे लागेल. राहुल गांधी यांनी पक्षाच्या विजयासाठी प्रचंड कष्ट घेतले हे त्यांचे विरोधकही मान्य करतात. पण तरीही त्यांच्या वाट्याला दारुण पराभव आला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

राहुल गांधी यांचे नेमके काय चुकले, यावर भाष्य करणाऱ्या अनेक प्रतिक्रियांचा मारा सध्या सुरू आहे. पण मुळात या पराभवाला एकट्या राहुल गांधी यांनाच जबाबदार धरले जाणे योग्य आहे काय, याही प्रश्‍नाचा सखोल विचार करायला हवा. जनतेशी नाळ तुटलेले पक्षाचे अन्य नेते सर्वच पातळ्यांवर महत्त्वाच्या जागा अडवून बसले आहेत. पिढ्यान्‌पिढ्यांचे राजकारण या पक्षात सुरू आहे. प्रत्येकाने आपापली संस्थाने निर्माण करून ठेवली आहेत. त्यांची पापे कॉंग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरत आहेत हेही एक महत्त्वाचे कारण आहेच. पण पक्षाध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या नेत्यांना दूर सारून दुसऱ्या तरुण नेतृत्वाला वाव देणे अपेक्षित होते; पण जुने लोक दुखवायला नको म्हणून त्यांनी बोटचेपे धोरणानेच पक्षात अल्पसे बदल केले. त्याचा योग्य तो परिणाम झाला नाही.

मध्य प्रदेश आणि राजस्थानात विजय मिळाल्यानंतर राहुल यांनी तेथे अनुक्रमे ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्या सारख्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी द्यायला हवी होती. पण त्यांनी तेथे जुनेच नेते पुन्हा मुख्यमंत्री करून मिळालेल्या सत्तेची रया घालवली. या दोन्ही राज्यांत मिळून कॉंग्रेसचा केवळ एकच खासदार निवडून आला आहे. अठरा राज्यांतून कॉंग्रेस पूर्ण उखडली गेली आहे. ही केविलवाणी स्थिती आहे. स्वतः राहुल गांधी यांनाही अमेठीतून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आता स्वतःहून दूर होणे अपेक्षितच होते. वास्तविक राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारून फार मोठा काळ लोटला आहे असे झालेले नाही. त्यांच्या अध्यक्षपदाखाली लढवली गेलेली लोकसभेची ही पहिलीच निवडणूक होती. गेल्या लोकसभेच्यावेळी पक्षाचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे होते. आज राहुल गांधी यांच्याकडे वय हा एक मोठा जमेचा फॅक्‍टर आहे. आज ते केवळ 47 वर्षांचे आहेत.

आपल्याकडील पद्धतीनुसार वयाच्या किमान 75 वर्षांपर्यंत तरी राजकीय नेत्यांची राजकारणात चलती असते. उलट जितके वय जास्त तितका तो राजकारणात अधिक परिपक्‍व असे मानण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे आजच पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन उर्वरित काळ राहुल गांधी हे काय केवळ पक्षाचे कार्यकर्ते म्हणून राहणार का? आणि ते त्यांना शोभून दिसणार का? हा महत्त्वाचा विषय आहे. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काहीही साध्य होईल असे वाटत नाही. त्यापेक्षा पक्षाच्या मूलभूत विचारसणीत आणि कार्यपद्धतीत काही आमूलाग्र बदल करता येतील का? हे त्यांनी पाहायला हवे. कॉंग्रेसने आजवर कायम दलित, ओबीसी, अल्पसंख्याक, कामगार यांच्या हिताची भाषा केली. पण त्यातून सामाजिक विभागणीलाच खतपाणी मिळत गेले. देशात हिंदू अस्मिता जागृत झालेला मध्यमवर्ग हा कॉंग्रेसने कधीच जमेला धरला नाही.

कॉंग्रेसने सेक्‍युलॅरिझमचे तत्त्व सोडले पाहिजे असे कोणीही म्हणणार नाही. पण सेक्‍युलॅरिझम म्हणजे केवळ मुस्लीम अनुनय नव्हे हे कधी तरी एकदा त्यांना लोकांना पटवून द्यावे लागणार आहे. सेक्‍युलॅरिझम म्हणजे हिंदू विरोध नाही हेही त्यांनी स्पष्टपणे लोकांना सांगण्याची गरज आहे. राजकारणाची ही लढाई आता यापुढे हिंदुत्व आणि सेक्‍युलॅरिझम या तत्त्वांमध्येच अधिक जोरकसपणे लढली जाणार आहे. सेक्‍युलॅरिझमविषयी देशातील बहुसंख्यांच्या मनात निर्माण झालेली तिटकाऱ्याची भावना दूर करण्यासाठी त्याची नेमकी मांडणी लोकांपुढे करावी लागेल. सध्याच्या वातावरणात कॉंग्रेसने आपण हिंदू विरोधी नाही हे अधिक ठळकपणे लोकांच्या लक्षात आणून देण्याची गरज आहे.

कॉंग्रेसची विचारधारा त्यांच्या विरोधकांनी सातत्याने बदनाम केली. पण त्याला प्रत्युत्तर देण्याची फिकीर कॉंग्रेसने दाखवली नाही. ती दाखवून लोकांच्या मनात पुन्हा विश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्याचे आव्हान सोडून राहुल गांधी यांना पक्षाध्यक्षपदापासूनच दूर व्हायचे असेल तर तेवढ्याने कॉंग्रेसचे भले होईल असे मानता येणार नाही. मुळात पक्षाध्यक्षपद सोडून राहुल गांधी आपल्या राजकीय आयुष्याच्या पुढील किमान 25-30 वर्षांत नेमके काय करणार हेही स्पष्ट झाले तर बरे होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)