पुणेः राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाचा इतर लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनाचा लाभ सोडावा असे आवाहन केले होते. तसेच राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडत असल्याने या योजनेच्या मिळणाऱ्या लाभासाठी काही अटी शर्ती आखून देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने आतापर्यंत ५ लाख महिलांना अपात्र ठरवले आहे. यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार का? अशी चर्चा महिलांमध्ये केली जात आहे. आता यावर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही, अशी पोस्ट अदिती यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केली आहे. कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, असे स्पष्टीकरण अदिती यांनी पोस्टमध्ये दिले आहे.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,०००, वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,०००, कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,००० एकूण अपात्र महिलांची संख्या पाच लाख असल्याची माहिती अदिती यांनी दिली.
राज्य शासनाने ही योजना जाहीर केली त्यावेळी तब्बल २ कोटी ६३ लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ कोटी ४९ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. मात्र, आता इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या पाच लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले असून त्यांना या योजनेचा लाभ आता त्यांना घेता येणार नाही.
शासनाकडून पडताळणी सुरू
अशातच आता पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. महिला व बालकल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने पडताळणीसाठी व्यापक तयारी सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर लाभार्थ्यांची यादी वर्गीकृत केली जात आहे. या चौकशीदरम्यान लाभार्थ्यांच्या आर्थिक स्थितीची आणि चारचाकी वाहनांच्या मालकीची तपासणी केली जात आहे.