मुख्यमंत्री आज कराडात : भूमिपूजनाबाबत लोकांमध्ये उत्सुकता
सातारा हद्दवाढीचा निर्णय अपेक्षित
सातारा शहराची हद्दवाढ करण्याची मागणी उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांनी वारंवार केली आहे. उदयनराजे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सातारा शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला सरकार मंजुरी देईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर दीड वर्ष उलटून ही सातारा शहराच्या हद्दवाढ होण्याच्या दृष्टीने कोणतीही पावले पडताना दिसून येत नाहीत. त्यामुळे साताऱ्याच्या हद्दवाढीबाबत देखील मुख्यमंत्री कराडच्या दौऱ्यात ठोस घोषणा करतील, अशी ही अपेक्षा व्यक्त होत आहेत.
सातारा – साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजचे भूमीपूजन कधी होणार, असा प्रश्न जिल्हावासियांना पडला असून त्याचे उत्तर खुद्द मुख्यमंत्र्यांकडून उद्या मिळणार का? याची उत्सुकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरूवारी कराड दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री मेडिकल कॉलेजच्या भूमीपूजनाची तारीख जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे.
आघाडी सरकारच्या काळात बारामतीसह मंजूरी मिळालेल्या साताऱ्यातील मेडिकल कॉलेजची अद्याप एक वीट ही रचली गेलेली नाही. दुसऱ्या बाजूला बारामतीच्या मेडिकल कॉलेजची इमारत बांधून झाली आहे. अशावेळी साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजच्या कामाला गती मिळावी, अशी इच्छा जिल्ह्यातील डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी, रूग्ण नागरिकांची आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणात मेडीकल कॉलेज मंजुरीपुरते कागदावर मर्यादित राहिले. दीड वर्षापूर्वी उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉलेजच्या जागेचा प्रश्न निकालात काढला.
त्यामध्ये जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण खात्याचे संयुक्त मंत्री गिरीश महाजन यांनी कृष्णा खोरे महामंडळाची 25 एकर जमीन मोफत स्वरूपात मेडिकल कॉलेजसाठी वर्ग केली. पुढे पुन्हा सातारा दौऱ्यावर मुख्यमंत्री आले. त्यांनी एका महिन्याच्या आत कॉलेजसाठी पदनिर्मितीचा प्रस्ताव पाठवा, सरकार त्यास तात्काळ मंजूरी देईल असे जाहीर केले. तो प्रस्ताव सरकार तत्काळ पाठविण्यात आला मात्र, अद्याप मंजुरी मिळालेली नाही.