जम्मूमध्ये काय होणार?

स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसने जम्मू-पूँछ या लोकसभेच्या जागेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. तथापि, 1977 च्या आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब केसरीचे संस्थापक आणि जनसंघाचे नेते लाला जगत नारायण यांनी आपले मित्र ठाकूर बलदेव सिंह जसरोटिया यांना रिंगणात उतरवले आणि विजयही मिळवून दिला. जसरोटियांच्या रुपाने पहिल्यांदाच जम्मू-पूँछ मतदारसंघात विरोधी पक्षाने खाते उघडले होते.

2014 च्या निवडणुकांत या लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या जुगल किशोर शर्मा यांनी विजय मिळवला असला तरी आजवरच्या 15 लोकसभा निवडणुकांपैकी 11 वेळा तेथे कॉंग्रेसचा उमेदवारही विजयी झाला आहे. 1967 आणि 1972 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचे इंद्रजित मल्होत्रा यांनी येथून विजय मिळवला होता. 1977 मध्ये जनसंघाने ही जागा जिंकली. त्यानंतर सातव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकांत कॉंग्रेसच नेते गिरधारी लाल डोगरा यांनी विजय मिळवला. त्यानंतर आठव्या आणि नवव्या लोकसभेसाठीच्या निवडणुकांमध्ये जम्मू-पूँछमधील जनतेने कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जनक राज गुप्ता यांना खासदार म्हणून निवडले. 11 व्या लोकसभेसाठी कॉंग्रेसचे पंडित मंगत राम शर्मा यांना जनतेने निवडून दिले.

1951 मध्ये स्थापन झालेल्या जनसंघाने आणि 1980 मध्ये स्थापन झालेल्या भाजपाने अनेक वर्षांपासून जम्मू-पूँछ लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र आजवर तेथे केवळ तीनदाच भाजपाचे कमळ उमलले. बाराव्या लोकसभेच्या निवडणुकांत भाजपाचे उमेदवार वैद्य विष्णु दत्त यांनी कॉंग्रेसच्या पंडित मंगत शर्मा यांना पराभूत केले आणि लोकसभेत प्रवेश केला. 13 व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकांतही वैद्य विष्णु दत्त यांनी विजय मिळवला; पण दुर्दैवाने त्यांचे लगेचच निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकांत नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार चौधरी तालिब हुसेन यांनी विजय मिळवला. 14 आणि 15 व्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मदनलाल शर्मा यांनी विजय मिळवत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे, 2008 मध्ये झालेल्या अमरनाथ भूमी आंदोलनामुळे येथे मतांचे ध्रुवीकरण झाले होते. असे असूनही शर्मा यांनी भाजपाच्या लीलाकर्ण शर्मा यांना पराभूत केले. 2014 मध्ये मात्र मोदीलाटेमुळे येथे जुगल किशोर शर्मा यांनी मदनलाल शर्मांचा मोठ्या मताधिक्‍याने पराभव करत लोकसभेत एंट्री घेतली. या निवडणुकांत पीडीपीचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकला गेला होता.

यावेळच्या निवडणुकांसाठी जुगलकिशोर शर्मांच्या विरोधात नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार रमण भल्ला रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक अधिक रंजक होणार आहे. याचे कारण ही लढत केवळ दुरंगी नाही. तिथे पाकव्याप्त काश्‍मीरमधून विस्थापित झालेल्यांचे नेते राजीव चुन्नी आणि पश्‍चिम पाकिस्तानातून येणाऱ्या निर्वासितांचे नेते लब्बा राम गांधी रिंगणात उतरले आहेत. याखेरीज भाजपातून विभक्‍त होऊन डोगरा स्वाभिमान संघटना स्थापन करणारे माजी मंत्री चौधरी लाल सिंहही रिंगणात आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांचे प्रतिनिधी सुशिल सूदन यांनीही भाजपाच्या अडचणी वाढवल्या आहेत. दिवसागणिक बदलणाऱ्या समीकरणांचा विचार करता आणि एकंदरीतच काश्‍मीरमधील सध्याची स्थिती पाहता यंदा ही जागा कोण जिंकणार याकडे देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.