Imtiaz Jaleel | छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. औरंगजेबाची कबर हटवा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाकडून केली जातआहेत. केवळ हिंदू संघटनाच नाही तर भाजपचे काही मंत्री, शिवसेनेचे मंत्री करीत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात देखील याचे पडसाद उमटत आहे.
या प्रकरणावरून नागपुरात मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर जाळपोळ, तोडफोड झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीत अनेक पोलिस जखमी झाले. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जनतेला विचार करायला लावणारे पत्र लिहले आहे.
इम्तियाज जलील यांनी त्यांच्या ट्वीटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. या पत्रात त्यांनी नागपुरात झालेली घटना, औरंगजेबाचा कबर हटवण्यावरुन सुरु असलेले राजकारण यावर पत्र लिहिले आहे.
इम्तियाज जलील यांचे संपूर्ण पत्र
प्रिय जनतेला माझा सप्रेम संदेश…
देशात होळी, रंगोत्सव, रमजान, लोहडी तसेच विविध प्रांतात वसंतोत्सव विविध पद्धतीने साजरा होत आहे. सामान्य माणसाला या उत्सवांच्या दरम्यान अर्थार्जनाची चांगली संधी असते. मात्र राजकीय वातावरण दुषित करून सर्वच धर्मियांमध्ये एक असुरक्षितता निर्माण करण्याचे काम राजकीय मंडळी करत आहेत. ज्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे त्यांना या असुरक्षित वातावरणाची झळ पोहचत नाही.
मात्र दररोज कमाई करून खाणारे अनेक लोक यामुळे भयाखाली जगतात. सणाच्या मांगल्यावर भयाचे सावट निर्माण होते ते वेगळेच. बोर्डापासून ते स्पर्धा परिक्षा पर्यंत हजारो पेपर लिक होताहेत. रोजगाराच्या अपुऱ्या संधीमुळे छोट्या शहरातून प्रचंड प्रमाणात स्थलांतर होताहे. शेतकरी कासावीस आहे. गेल्या पाच वर्षात सिंचनाची आकडेवारीच दिली जात नाहीये. बीडच्या घटनांमुळे, अक्षय शिंदे एन्काऊंटर सारख्या घटनांमुळे प्रगतीशील विचारांच्या महाराष्ट्रात गुंडाराज निर्माण झाल्याचे चित्र आहे. यावर तर्क देण्याऐवजी आता औरंगजेबाची कबर उखडून काढण्याची टूम सुरू झाली आहे. Imtiaz Jaleel |
या शहरात परवाच १०० मिमीची पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा करता आला नव्हता. पर्यायी पाणी पुरवठा योजनाच अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. आता निवडणूक झाल्यामुळे नेत्यांना त्यावर बोलायची गरजही वाटत नाहीये. आता ५ वर्षे निवांत. लोकांच्या दैनंदिन जगण्यातील समस्यांत वाढच होत आहे. त्यावर एकही राजकारणी बोलत नाही. आदर्श पतसंस्था, मलकापूर बँक खातेदारांच्या समस्या यावर कोणी बोलणार आहे का? पर्यटन नगरी असलेल्या शहरात मुगल काळातील इतिहास उकरत बसल्याने काय साध्य होणार आहे?
धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शक्ती सक्रिय
राष्ट्रीय माध्यमातून या पर्यटन शहराची बदनामी करण्याचे हे कारस्थान आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व धर्मिय जनतेचे नुकसान होणार आहे. हे मी एक मुस्लिम म्हणून सांगत नसून एक भारतीय म्हणून सुद्धा सांगू इच्छितो. अनेक उद्योग येथे येण्यास उत्सुक आहेत. मात्र या शहराला दंगलीचे शहर म्हणून प्रकाश झोतात आणले जात आहे. पाणी नाही म्हणून उद्योग नाहीत, आता त्यात या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शक्ती सक्रिय झाल्या आहेत. Imtiaz Jaleel |
बाबरी मशीद प्रकरण पेटवून भाजपा मोठी झाली आणि आता…
मला औरंगजेब या विषयावर बोलते करण्याचा प्रयत्न अनेक माध्यमे करत आहेत. सर्वप्रथम या सर्व माध्यमांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे. मी मुसलमान लोकप्रतिनिधी आहे म्हणून जर तुम्ही मला बोलते करू इच्छित असाल तर तुमच्या पत्रकारितेत खोट आहे. मी भारतीय मुसलमान आहे हे नक्की. मात्र ते भारतीय असणे तुम्हाला एरवी आठवत नाही याच्या वेदना होतात. बाबरी मशीद प्रकरण पेटवून भाजपा मोठी झाली. आता औरंगजेबाची कबर उध्वस्त करायच्या धमक्या काही धर्मांध संघटना देत आहेत. त्यावर सत्ताधारी मौन आहेत. इतकेच नव्हे तर शाहू, फुले व आंबेडकरांची परंपरा सांगणारेही मौन आहेत हे अधिक आश्चर्यकारक आहे.
मी व माझ्यासारखे अनेक हिंदू-मुस्लिम, शीख, बौद्ध, इसाई या शहरात लहानाचे मोठे झाले. या शहरात औरंगजेबाच्या जयंत्या-मयंत्यांना कधी उत्सव झालेले नाहीत याचे साक्षीदार येथिल हजारो नागरिक आहेत. पण जे मुळचे या शहराला कधी ओळखत नाहीत त्यांनाच औरंगजेबाची सर्वाधिक आठवण येते. या देशात अनेक सुंदर इमारती, वारसास्थळे आहेत ते बौद्धांचे आहेत, मुगलकालिन आहेत, राजपुतांच्या आहेत, मराठ्यांच्या आहेत, अनेक सुरेख इमारती ब्रिटीशकालीन आहेत, यादव कालिन किल्ला औरंगाबाद जवळ आहे.
या सगळ्याच वारसास्थळांचे जतन करण्याची तरतूद भारतीय घटनेत आहे. त्यामुळे कोणतीही हेरिटेज साईट उध्वस्त करण्याच्या धमक्या जेव्हा दिल्या जातात तेव्हा माध्यमांनी सर्वप्रथम इतिहास तज्ज्ञ, पुरातत्व विद्वान, वर्षोनुवर्षे उत्खनन करून इतिहासाची पाने लिहिणारे संशोधक यांना घेऊन टीव्ही चर्चा घडवून आणल्या पाहिजेत. या देशाच्या पत्रकारितेकडून याच किमान अपेक्षा आहेत. परंतू माध्यमे राजकीय नेत्यांना, त्यांच्या अर्धवट ज्ञानी प्रवत्तत्यांना घेऊन सगळ्या चर्चा करत बसतात. माध्यमांनी त्यांच्या घटनाबाह्य वक्तव्यांना प्रसिद्धीच दिली नाही तर पत्रकारिता लोकांचे कल्याण करू शकते असे मला प्रामाणिकपणे वाटते.
…तर पुढची दीडशे वर्ष एक-एक वास्तू पाडण्यावर राजकारण होइल
मी स्वतः इतिहासाचा अभ्यासक नाही. मात्र या शहराचा लोकप्रतिनिधी राहिलो आहे त्यामुळे येथील वास्तूंचे जतन व्हावे व त्यातून महसूल यावा असे मला वाटते. औरंगजेबावर मीच का बोलावे? काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत सगळ्याच विरोधी पक्षांनी बोलले पाहिजे. इतिहासातील युद्धांचा संदर्भ देत वर्तमानात राजकारण होऊ नये याची खबरदारी राज्यघटनेत घेतलेली आहे. यावर हिंदू-मुस्लीम अशी चर्चा न होता मुगल कालिन सगळ्याच वास्तू पाडायच्या आहेत का? यावरच चर्चा एकदाची घडवून आणा. दररोज एक मुगल कालिन वास्तू घेऊन राजकारण करायचे ठरले तर पुढची दीडशे वर्ष एक-एक वास्तू पाडण्यावर राजकारण होऊ शकते.
दुसरे उदाहरण देतो जेरुसलेमचे ज्यू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांचे महत्त्वाचे केंद्र असल्याने तिथेही सतत हिंसा, वाद सुरू असतात. त्याचा फायदा स्थानिक लोकांना होत नसून सो कॉल्ड विकसित देश त्यातून मतलब साध्य करून घेतात. हा सगळा अभ्यास करून, आकलन करूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी वैविध्यासह सह अस्तित्व देणारी घटना अस्तित्वात आणली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाची कबर बांधली. आदिलशहाचा सेनापती अफजल खानाच्या कबरीवरून देखील भरपूर वाद झाले. संभाजी ब्रिगेडचा एक रिसर्च, दुसरा क्रमिक पुस्तकाताली उल्लेख आणि तिसरा या दोन्हींना नाकारणारा. वर्ष २०२२ मध्ये ही कबर सील करून वनखात्याने आता तिथे वनराई फुलवली आहे.
महाराष्ट्राच्या सद्यस्थिती वर मा. खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया* pic.twitter.com/bgV9nLIxan
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) March 18, 2025
इतिहासात असे अनेक किस्से आहेत जे हिंदू मुस्लिम सौहार्द पण दाखवतात आणि वैर पण सिद्ध करतात. पण वर्तमान काळात यावर उपाय एकच वाटतो. सगळी वारसास्थळे आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात असली पाहिजेत. पर्यटक तिथे येतील, त्यांना गाईड करणारे गाईड्ज जो इतिहास आहे तो सांगतिल. यात राजकीय हस्तक्षेपा पेक्षाही इतिहास अभ्यासकांची भूमिका असावी.
इतिहास मिटवायचा नसतो तर त्यातून बोध घ्यायचा असतो
हिटलरच्या छळछावण्यांचा इतिहास पाश्चात्त्य देशांनी जतन केला व त्यातून नव्या पिढीने चांगला बोध घेतला. इतिहास मिटवायचा नसतो तर त्यातून बोध घ्यायचा असतो. दुसऱ्या महायुद्धावर इतके चित्रपट तयार झाले की त्यांची संख्या फार मोठी आहे. पण त्यामुळे युरोपात दंगली झाल्या का? नाही झाल्या. उत्तम रिसर्च करून चित्रपट तयार झाले. लोकांनी ते पाहिले. त्यामुळे त्यांना अहिंसेचे महत्वच समजले. भारतातील उच्चशिक्षित नेत्यांना युरोपला जाऊन फोटो काढायला आवडते. पण युरोप इतका संपन्न का आहे ? याच्या मुळाशी जावे वाटत नाही.
… पण आज लोकशाही आहे याचा विसर आपल्याला पडलाय
इतिहासात उल्लेख आहे कि, सम्राट अशोकाने स्वतःच्या ९९ भावांना संपवून गादी मिळवली होती. नंतर तो बुद्धत्वाकडे गेला. तो बुद्धत्वाकडे गेला हा इतिहास महत्त्वाचा आहे की त्याने भावाला ठार केले हा इतिहास महत्त्वाचा आहे? औरंगजेब कसा होता ? हे इतिहास तज्ज्ञांना ठरवू द्या. त्या काळात तो एक राजा होता हि वस्तुस्थिती आहे. त्याने प्रांत जिंकण्यासाठी हिंदू व मुस्लिम पातशाह्यांशी सुद्धा संघर्ष केले. निजाम, आदिल शहाशी तो लढला. केवळ तोच नाही तर प्रत्येक राजा हा सत्तेसाठी स्वतःच्या रक्ताच्या नातलगांशी लढला आहे. त्यात त्याचा धर्म कोणता हा प्रश्नच नाही. तो त्याकाळी राजा होता, तेव्हा लोकशाही नव्हतीच. पण आज लोकशाही आहे याचा विसर आपल्याला पडत आहे याच्या इतकी मोठी शोकांतिका नाही, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा:
कृष्णा आंधळेकडे महत्वाचे पुरावे; त्याला पकडणे अतिशय गरजेचे : धनंजय देशमुख