लॉकडाऊनचा काय परिणाम झाला?, कंपन्यांना माहिती सादर करण्याची सेबीची सूचना

मुंबई- लॉकडाऊनमुळे सध्या बऱ्याच कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. हा परिणाम नेमका किती झाला या संदर्भातील माहिती कंपन्यांनी शेअर बाजारांना कळवावी. त्यामुळे गुंतवणूकदारांना कंपन्यांच्या कामकाजाबाबत माहिती होऊ शकेल असे बाजार नियंत्रक सेबी या संस्थेने म्हटले आहे.

यासंदर्भात सेबीने कंपन्यांना एक मार्गदर्शक नियमावली उपलब्ध केली आहे. यात म्हटले आहे की, काही कंपन्यांनी लॉकडाऊनमध्ये कामकाज थांबले असल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर करोना व्हायरसचा संसर्ग वाढणार नाही यासाठी कंपन्यांनी काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती दिली आहे. मात्र याचा कंपन्यांच्या ताळेबंदावर काय परिणाम झाला आहे. तो किती काळ टिकणार आहे. या संदर्भातील माहिती फारशा प्रमाणात उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना अशा प्रकारची माहिती उपलब्ध होणे गरजेचे आहे असे सेबीने म्हटले आहे.

सेबीने केलेल्या सूचनेनुसार कंपन्यांनी करोनाचा आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम झाला. उत्पादन सुरू करण्यासाठी काय केले आहे. कंपन्यांची भांडवली आणि वित्तीय परिस्थिती काय आहे. खेळते भांडवल किती प्रमाणात उपलब्ध आहे. इत्यादीसंदर्भातील माहिती शेअर बाजारांना कळविणे अपेक्षित आहे.

जगभरातील कंपन्या शेअर बाजारांना सध्याच्या परिस्थितीत अशी माहिती उपलब्ध करीत आहेत. त्यामुळे कंपन्यांचे एकूण चित्र गुंतवणूकदारांना स्पष्ट होते आणि गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसंदर्भातील आपले निर्णय घेता येतात. सेबीने बऱ्याच कंपन्यांना सध्याच्या परिस्थितीत काही अहवाल देण्याबाबत सवलती दिल्या आहेत. मात्र आता करोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपल्यानंतर सर्व माहिती कंपन्यांनी शेअर बाजारांना कळवावी असे सांगण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.