गळ्यात पडणाऱ्या आर्थिक उत्पादनांचे काय करावे? (भाग-2)

गळ्यात पडणाऱ्या आर्थिक उत्पादनांचे काय करावे? (भाग-1)

अशा गळ्यात पडलेल्या गोष्टींचे काय करावे?
बहुतेक वेळा अनेक विमा पॉलिसी आपल्या गळ्यात पडलेल्या असतात. विमा उतरवणे म्हणजे अघटीत घटना घडल्यावर आर्थिक ताण येऊ नये यासाठीची उपाययोजना. त्यासाठी शुद्ध विमा (टर्म पॉलिसी) विकण्याऐवजी शेअर बाजाराशी संबंधित युलिप किंवा अन्य योजनांमधून परताव्याचे आमिष दाखवून पॉलिसी विकण्यावर एजंटांचा भर असतो. विमा आणि त्यासाठी भरावा लागणारा हप्ता याचा विचार सुरक्षा कवचाच्या दृष्टीने करण्याऐवजी गुंतवणूक पर्याय म्हणून केला जातो आणि मग अनेक अनावश्‍यक पॉलिसी ग्राहकांच्या गळ्यात पडत जातात. तुम्ही बॅंकेत घरासाठी कर्ज मागायला जाता आणि त्या कर्जाला कव्हर म्हणून विमा उतरवण्याचा आग्रह तुम्हांला केला जातो. तुमच्याकडे आधीच विमा पॉलिसी असते. काही अघटीत घडले तर त्या पॉलिसीतून मिळणाऱ्या रकमेतून कर्जफेड करणे शक्‍य असते. परंतु रिलेशनशिप मॅनेजर असे काही शैलीदार भाषण ठोकून वातावरण निर्मिती करतो की, तो सांगत असलेले प्रॉडक्‍ट/पॉलिसी तुम्हांला एकदम भारी वाटू लागते. अनेकदा त्या प्रॉडक्‍टमधील इतर गोष्टी, बाहेर पडण्यासंदर्भातील अटी, छुपे खर्च याबाबतची माहिती हेतूतः सांगितली जात नाही. अशा पद्धतीने विकण्यात आलेली विमा पॉलिसी तुम्ही ठराविक मुदतीत परत करू शकता आणि त्याबद्दल तुमच्याकडून कुठलेही शुल्क कापून घेतले जात नाही. भारतीय विमा नियमन प्राधिकरणाने (आयआरडीए – इर्डा) सर्व विमा कंपन्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विमा पॉलिसी परत करण्यासाठी कमीत कमी 15 दिवसांची मुदत असते. बहुतेक कंपन्या या कालावधी तीस दिवसांचा ठेवतात. लक्षात ठेवा तुम्ही त्या विशिष्ट विमा पॉलिसीच्या अर्जावर सही केल्याच्या दिवसापासून नव्हे तर त्या विम्याचे कव्हर तुम्हांला ज्या दिवसापासून लागू होते त्या दिवसापासून हा कालावधी मोजला जातो.

बॅलन्स्ड फंड –
बॅलन्स्ड फंडातील गुंतवणुकीवर रिलेशनशिप मॅनेजरला सर्वात जास्त कमिशन मिळत असते. त्यामुळे अनेकदा ग्राहकांना बॅलन्स्ड फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा आग्रह केला जातो. जर तुमच्याकडे आधीच विविध कंपन्यांचे शेअर असतील तर बॅलन्सड्‌ फंडात आणखी गुंतवणूक करणे म्हणजे अधिक जोखीम स्वीकारणे. त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही बॅलन्स्ड फंडात गुंतवणूक केली असेल तर लगेचच त्यातून बाहेर पडा. गुंतवणुकीनंतर तुम्ही एक वर्षाच्या आत बाहेर पड़त असाल तर तुम्हांला एक टक्का एक्‍झिट लोड आकारला जातो. अनेकदा आणखी जोखीम स्वीकारण्याऐवजी हा एक टक्का एक्‍झिट लोड परवडणारा असतो. अर्थात बॅलन्सड्‌ फंडातून बाहेर पडण्याऐवजी तुम्ही शेअर बाजारातील गुंतवणूक कमी करून जोखीमीचे संतुलन राखू शकता. मात्र ते संतुलन करताना हाती असलेले शेअऱ किती नफ्यात विकावे लागत आहेत किंवा तोट्यात विकावे लागणार आहेत याचाही विचार करा. एक्‍झिट लोड आणि शेअर विक्रीसाठीचे ब्रोकरेज किती असणार याचीही तुलना करून पहा.

सोन्याची नाणी/बिस्कीटे
जर गळी पडून कुणी तुम्हांला सोन्याची बिस्कीटे, नाणी यामध्ये गुंतवणूक करायला लावली असेल तर त्यातून लगेच बाहेर पडणे शक्‍य होत नाही. कारण मग पुन्हा ते सोने विकायचे असेल तर बाजारातील किंमतीपेक्षा पाच ते दहा टक्के कमी किंमतीला विकावे लागते. अशावेळी थांबणे योग्य ठरते. सोन्याचे भाव वाढल्यावर तोटा होणार नाही याचा हिशेब करून बाहेर पडणे श्रेयस्कर.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)