खासगी डॉक्टरांचा सवाल : सर्व नियमांचे तंतोतंत पालन केल्यास करोनावर मात शक्य
पुणे(प्रतिनिधी) – करोनाची चेन ब्रेक करण्यासाठीच सुरुवातीला डॉक्टरांनी आपले क्लिनिक बंद ठेवले होते. मात्र, आता जवळपास सगळीच छोटी-मोठी क्लिनिक सुरू असून सगळे डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत. मात्र, जर एखाद्या रुग्णाला माहित नाही की आपणास करोना आहे. अशावेळी ‘तो’ दवाखान्यात आल्यावर करायचे काय? हा प्रश्न सध्या अनुत्तरीच असल्याचे खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सध्या करोना व्हायरसने सर्वत्र धुमाकुळ घातला असून त्याने आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच डॉक्टरांना “देवदूत’ म्हटले जाते. पण छोटे क्लिनिक उघडत नाही डॉक्टर सेवा देत नाही अशा तक्रारी अद्यापही येत आहेत. पण आता असंख्य छोटे-मोठे डॉक्टर काळजी घेत उपचार करीत आहेत.
पण सुरुवातीला करोनची चेन ब्रेक करण्यासाठी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले होते. त्यावेळी ज्या अफवा पसरल्या होत्या त्या अफवांमुळे डॉक्टर बदनाम झाले आहेत. मात्र, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता खोकला, सर्दी, घशात खवखवणे, ताप येणे असे लक्षणे दिसत असतील तर पहिले सरकारी रुग्णालयात आपली चाचणी करून घेतल्यास उत्तम ठरणार आहे, असा सल्लाही खासगी डॉक्टरांनी दिला आहे.
इ कॉमर्स सेवा देणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढली….
सध्या इ कॉमर्समधून सेवा देणाऱ्या कंपन्या (उदा. जस्टडायल) रुग्णांना डॉक्टर सुचवतात. या कंपन्या डॉक्टरांकडून “कट’पद्धतीने पैसे घेतात व जे डॉक्टर या कंपन्यांना पैसे देतील त्यांची नावे ते रुग्णांना देतात. त्यामुळे आम्ही रुग्णांना सांगतो की ज्या डॉक्टरांना तुम्ही ओळखता त्यांच्याशी फोनद्वारे, इमेलद्वारे संपर्क करा, तुम्हाला कोणी नाही म्हणाणार नाही असे डॉक्टरांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.
तर तो खर्च कोण करणार?
एखाद्या रुग्णामुळे जर छोटे क्लिनिक किंवा हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ करोना पॉझिटिव्ह झाले तर 14 दिवस दवाखाना बंद ठेवावा लागतो. त्यामुळेही नागरिकांच्या मनात शंका निर्माण होते. तर पॉझिटिव्ह सापडलेल्या स्टाफचा खर्च कोणी करायचा असा प्रश्नही सध्या डॉक्टरांच्या मनात निर्माण होत आहे.
या उपायांमुळे करोना दूर राहिल …..
1)सोशल डिस्टन्सिंग पाळा
2)कोणतीही गोष्ट (धुण्यायोग्य) 120 डिग्रीवर उकळली तर ती पूर्णपणे निर्जंतूक होते
3)मास्कचा वापर करा
4)हात स्वच्छ धुवा
5)सॅनिटायझरचा वापर करा
6)कपडे स्वच्छ धुतल्यानंतर उन्हात वाळवा आणि घालण्याच्या आधी इस्री केल्यास ते निर्जंतुक होतात