पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पिंपरीतील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी (दि. ८) सकाळी दहा वाजता दहावी व बारावीनंतर काय ? या करिअर मार्गदर्शन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामध्ये एमपीएससी व युपीएससी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे व्याख्याते अविनाश धर्माधिकारी हे दहावी आणि बारावीनंतरचे करिअर, व्यक्तिमत्व विकास आणि स्पर्धा परीक्षांवर पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.
दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच लागला आहे. या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांचे आयुष्याचे करिअर ठरविणारा टप्पा असतो. या परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची प्रक्रिया पार पाडत आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांना करिअरबाबत योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना पुढे आपण कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे असा मोठा गहन प्रश्न उभा राहिलेला असतो, अशा विद्यार्थ्यांना नेमके काय करायचे आहे, हे समजत नसल्याने गोंधळलेले असतात. म्हणून करिअरच्या संधीबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना अधिक लाभ होईल.
यासाठी पिंपरी-चिंचवडमधील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांना करिअरबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे, यासाठी चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक संचालक व निवृत्त आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे करिअर मार्गदर्शन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले.
अविनाश धर्माधिकारी हे विद्यार्थी व पालकांना सर्वात सामान्य करिअर ते अत्यंत दुर्मिळ करिअरची माहिती देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल. या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडमधील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शंकर जगताप यांनी केले आहे.