तेजीच्या काळात कोणत्या चुका टाळाव्यात? (भाग-१)

निवडणूक निकालाच्या आधीपासून शेअर बाजारात तेजी आली आहे. निकालानंतरही अद्याप ती कायम आहे. पूर्ण बहुमताचे स्थिर सरकार आणि त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीतील सातत्य, देशातील गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांकडे वाढलेला ओढा, परकीय गुंतवणूक संस्थांची गुंतवणूक यामुळे दीर्घकाळात शेअर बाजारतील गुंतवणुकीवर असाधारण परतावा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अर्थात शेअर बाजारात चांगला परतावा मिळवल्याची उदाहरणे आपण ऐकतो, पाहतो तसेच शेअर बाजारात हात पोळून घेतलेली देखील अनेक उदाहरणे असतात. अर्थात स्वतःचे हात पोळल्याचे सांगणारे खूपच कमी असतात. शेअर बाजारात हुकमी यश मिळवण्याच्या कुठलाही फॉर्म्युला नाही. त्यामुळे शेअर ट्रेडिंग करून रोज दहा हजार कमवा असे सांगणारे नेहमीच रोज दहा हजार कमावण्याऐवजी दुसऱ्यांना ट्रेडिंगचे प्रशिक्षण देऊन पैसा कमावत असतात ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

तेजीच्या वातावरणात गुंतवणूक करताना नेहमी होणाऱ्या चुका लक्षात घेऊन त्या टाळल्या पाहिजेत. त्याविषयी…

१) वेळ साधण्याची कसरत – नवखा गुंतवणूकदार नेहमीच जास्तीत जास्त नफा मिळण्याच्या उद्देशाने शक्य तितक्या कमी भावात घेऊन नंतर चढ्या भावात विकण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच शेअरबाजारातील परिस्थितीचा अंदाज म्हणजे निष्फळ प्रयत्न असतात. अगदी आयुष्य घालवलेल्या भल्याभल्या ट्रेडर्सना अचूक अंदाज येत नाही. त्यामुळे अचूक वेळ साधण्याच्या नादात कष्टाचा पैसा वाऱ्यावर उडवू नका.

तुम्ही कंपनीचा ताळेबंद, नफा, कर्ज, कंपनीच्या व्यवसायाचे भवितव्य आदी गोष्टींचा अभ्यास करून विशिष्ट कंपनीत गुंतवणूक केली तर बाजारात काहीही होवो त्या शेअरची किंमत कशी कमीजास्त होते याचा तुम्हांला काळाच्या ओघात अंदाज येत जातो. शेअर बाजार अनेक गोष्टींमुळे हेलकावे खात पुढे जात असतो. त्यामुळे बाकीच्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुमचे उद्दीष्ट निश्चित करून त्यानुसार कंपनी निवडून गुंतवणूक करणे योग्य ठरते.

तेजीच्या काळात कोणत्या चुका टाळाव्यात? (भाग-२)

२) ट्रेडिंगचे प्रयोग टाळा – ट्रेडिंग आणि गुंतवणूक या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. ट्रेडर हा नेहमीच कमी कालावधीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याउलट गुंतवणूकदार दीर्घकाळात चांगल्या परताव्याच्या आधारे संपत्ती निर्मितीचे उद्दीष्ट ठेवून गुंतवणूक करत असतो. ट्रेडिंगसाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. अभ्यास आणि संशोधन करावे लागते. त्याच बरोबर अनुभव आणि त्यासंदर्भातील तज्ञांची गरज भासते. ट्रेडिंग ही पूर्णवेळ करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे कुणी कितीही भरीला घातले तरी सामान्य गुंतवणूकदारांनी ट्रेडिंगच्या नादी लागू नये. अनेकदा ब्रोकरेज कंपनीत ऑर्डर मार्गी लावण्याचे काम करणारे एक्झिक्युटिव्ह फोन करून गुंतवणूकदारांना ट्रेडिंग करण्यास भाग पाडतात. एखाद्या वेळेस सुरवातीचे एक-दोन दिवस बरा प्रॉफिट होतो आणि तिसऱ्या दिवशी जबरदस्त मार बसतो. त्यामुळे दुसऱ्यावर विसंबून आणि कुणीतरी सांगितलेल्या टीपवरून कधीही प्रयोग करू नयेत. बहुतेकवेळा असे प्रयोग फसण्याचीच शक्यता अधिक असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)