तेजीच्या काळात कोणत्या चुका टाळाव्यात? (भाग-२)

तेजीच्या काळात कोणत्या चुका टाळाव्यात? (भाग-१)

३) कळपाचे वर्तन – तेजीच्या वातावरणात कथित भारी शेअरच्या टिपचा संसर्ग वेगाने सगळीकडे पसरतो. अनेकदा अमक्याने एका दिवसात दोन-चार लाख रुपये कसे कमावले याच्या सुरस कथा तुम्ही ऐकलेल्या असतात. बहुतेक वेळा टिप मिळालेले हे शेअर मध्यम किंवा छोट्या कंपन्यांचे असतात. तेजीच्या वातावरणात त्यांचा भाव वधारतो परंतु मुळात त्या कंपन्यांची स्थिती भक्कम असेलच असे छातीठोकपणे सांगता येत नसते. या कंपन्यांचा ताळेबंद, कर्ज, लाभांश, प्रगती याची ठोस आकडेवारी उपलब्ध असतेच असे नाही. अनेकदा अशा कंपन्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि तुम्ही त्या कंपनीचा शेअर खरेदी केल्यावर तो घसरणीला लागतो. तो इतका घसरतो की तुम्ही केलेली गुंतवणूक शून्याच्या आसपास येऊन ठेपते. त्यामुळे  अशा ऐकीव टिपनुसार गुंतवणूक म्हणजे अंधारात लक्ष्यभेद करण्यासारखे असते. अशी थेट जोखिम घेण्याऐवजी म्युच्युअल फंडातील मिडकॅप योजनांमध्ये गुंतवणूक करणे शहाणपणाचे ठरते.

४) इक्विटीतील विविधता – एकदम परिसस्पर्श व्हावा आणि आपण घेतलेला शेअर रोज वर चढत जावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. प्रत्यक्षात तसे कधीच होत नसते. दीर्घकालिन गुंतवणूक ही एक कला आहे आणि भक्कम आर्थिक स्थिती असलेल्या आणि उत्तम व्यावसायिक भवितव्य असलेल्या कंपन्या निवडणे आणि त्या कंपन्यांचे शेअऱ दर महिन्याला खरेदी करत राहणे यातूनच संपत्ती निर्मिती होत असते. असे करत असताना आरोग्य, ऑटो, आयटी, पेन्ट, बँकिंग अशा विविध क्षेत्रातील सात ते आठ उत्तम कंपन्यांचे शेअऱ तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणे आवश्यक आहे. त्यातून विशिष्ट क्षेत्रातील मंदी किंवा प्रतिकूल स्थितीवर मात करून सरासरी तुमचा पोर्टफोलिओ फायद्यात राहणे आणि तो फायदा हळूहळू वाढत राहणे शक्य होते.

५) एसआयपी बंद करणे – अगदी तेजीच्या वातावरणातही काही क्षेत्रात किंवा वर्गवारीत अनिश्चितता आणि मंदी असू शकते. अशा स्थितीत चालू असलेली एसआयपी थांबवून तो पैसा अन्यत्र तेजीच्या शेअरमध्ये वळवावा असा मोह गुंतवणूकदाराला होतो. दुसरीकडे मंदीच्या बाजारात तो तोटा सहन करून एसआयपीतून माघार घेतो. एकंदरीत बाजारात कशीही स्थिती असली तरी एखाद्या एसआयपीतील तुमच्या गुंतवणुकीचे विश्लेषण करण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी दिला पाहिजे. बाजारातील चढ-उतारावर कधीही एसआयपीबाबत निर्णय घेऊ नका. कारण एसआयपीचे यश सरासरी आणि चक्रवाढीत असते. मंदीच्या काळात तुम्हांला त्याच पैशात अधिक युनिट मिळतात तर तेजीच्या काळात कमी युनिट मिळाली तरी एनएव्ही वाढलेली असते.  अगदी चांगली कामगिरी करणाऱ्या शेअरची तुलना करताना दीर्घकाळात एसआयपी चांगला परतावा देते.

दीर्घकालिन यशासाठी भावना बाजूला ठेवा. विशेषतः भिती आणि हाव. संयम बाळगा आणि शिस्तबद्ध रितीने गुंतवणूक करत रहा. नियमितपणे पोर्टफोलिओवर लक्ष ठेवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)