नावापुरते वृक्षारोपण काय उपयोगाचे?

– संजोक काळदंते

सध्या सर्वत्र वृक्षलागवडीसाठी पुढाकार घेतला जात आहे. झाडे लावा झाडे जगवा, हा संदेश सर्वच स्तरांतून दिला जातो आहे. शासन-प्रशासन याकरिता प्रयत्नशील आहे, आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करून यंत्रणा देखील काम करताना दिसत आहे. मात्र, ही झाडे लावून त्यांचं संवर्धन होणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

सध्या सरकारने वृक्षारोपण करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली असली तरी या आधी लावलेल्या झाडांचे काय झाले, हा सवाल तितकाच महत्त्वाचा आहे. याआधी देखील वेळोवेळी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. सरकारच्या प्रत्येक विभागाने याकरिता काम केले. संवर्धनासाठी प्रयत्न देखील केले असतील, मात्र ही झाडे आता जिवंत नसल्याचे दिसते आहे.

तालुक्‍यातील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली होती, ती झाडे या ना त्या कारणाने जळालेली आहेत. कुठे पाण्याचा आभाव, तर कुठे निगराणी न राखल्याने ही रोपे जळून गेली. जिथे संगोपन व्यवस्थित करण्यात आले आहे,

अशा ठरावीक ठिकाणी लावलेली झाडे सध्या जिवंत आहेत. मात्र, वृक्षारोपण झालेल्या झाडांच्या तुलनेत त्यांची टक्केवारी अत्यल्प आहे. मग हा वृक्षलागवडीवर झालेला खर्च आणि त्याकरिता राबलेली यंत्रणा आणि परिश्रम वाया गेले का, असा प्रश्‍न सध्यातरी तालुक्‍यातून उपस्थित होत आहे.

याबरोबरच अवैध वृक्षतोडीचाही प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर जटिल होत चालला आहे. या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करता कामा नये. एका बाजूला वृक्ष संवर्धन करण्यासाठीचे प्रश्‍न आणि दुसऱ्या बाजुला वृक्षतोड व अवैध लाकूड वाहतूक होताना दिसते आहे.

मग निष्फळ वृक्षलागवडीसाठी मेहनत आणि खर्च का करावा. सरकारच्या यंत्रणेने आपआपली कार्यालयीन कामं सोडून या योजनांकडे लक्ष कशासाठी केंद्रीत करावयाचे, याचे उत्तर मिळत नाही. उद्दिष्ट फक्त झाडे लावण्याचे नसून, झाडे जगवण्याचे देखील आहे, असे मत सध्यातरी तालुक्‍यातील वृक्षप्रेमींमधूनच नव्हे तर सर्वच नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे. मात्र, यावर गांभीर्याने विचार व्हावा हीच अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.