“सरकारने दिलेल्या आकडेवारीचा शास्त्रीय आधार काय?”

लॉकडाऊनमुळे हजारों मृत्यू टळल्याच्या दाव्यावर कॉंग्रेसकडून प्रश्‍नचिन्ह

नवी दिल्ली -देशव्यापी लॉकडाऊनमुळे आणि इतर निर्णयांमुळे हजारों करोनामृत्यू टळल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला. त्यावर कॉंग्रेसने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज्यसभेत बुधवारी करोना संकटावर चर्चा झाली. त्यावेळी बोलताना कॉंग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. करोनाचा फैलाव रोखण्यात लॉकडाऊनची खरोखरीच मदत झाली का याची माहिती देशातील जनतेला मिळायला हवी.

लॉकडाऊनमुळे 37 ते 78 हजार मृत्यू टळले आणि 14 ते 29 लाख नागरिकांना होणारी संभाव्य बाधा रोखली गेल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी केला. सरकारने ती आकडेवारी कुठून मिळवली? त्याचा शास्त्रीय आधार काय, अशा प्रश्‍नांची सरबत्ती त्यांनी केली. लॉकडाऊन लागू करण्यात आला त्यादिवशी देशात 600 करोनाबाधित होते.

आता ती संख्या 50 लाखांवर गेली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. शर्मा यांनी पुढे बोलताना करोनाविरोधी लढ्याबद्दल डॉक्‍टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली. देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली.

Leave A Reply

Your email address will not be published.