Samosa Caucus | Donald Trump | Big Beautiful Bill : शुक्रवारी संध्याकाळी, अमेरिकेच्या वेळेनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ वर अधिकृतपणे स्वाक्षरी केली. एकीकडे व्हाईट हाऊसच्या लॉनमध्ये स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जात असताना, दुसरीकडे, देशाच्या अनेक भागांमध्ये या नवीन कायद्याबद्दल चिंता आणि संताप स्पष्टपणे दिसून येत होता. हे विधेयक कर कपात, सीमा सुरक्षा आणि व्यवसाय प्रोत्साहन यासारख्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याचा दावा करते, परंतु त्याच्या सामाजिक परिणामाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भारतीय वंशाच्या कायदेकर्त्यांचा एकत्रित आवाज :
या विधेयकाला सर्वात जास्त विरोध भारतीय वंशाच्या सहा अमेरिकन कायदेकर्त्यांनी केला आहे, ज्यांना एकत्रितपणे “समोसा कॉकस” म्हटले जाते. या गटात रो खन्ना, अमी बेरा, प्रमिला जयपाल, राजा कृष्णमूर्ती, सुहास सुब्रमण्यम आणि श्री ठाणेदार यांचा समावेश आहे. या नेत्यांनी या कायद्याला “नैतिक अपयश” आणि “गरिबांचा विश्वासघात” म्हटले आहे.
‘समोसा कॉकस’ हा शब्दप्रयोग करणारे राजा कृष्णमूर्ती म्हणाले, “या क्रूर विधेयकाचा विरोध करण्यासाठी मी १४ तास गाडी चालवून वॉशिंग्टनला गेलो. हा कायदा कोट्यवधी लोकांकडून आरोग्यसेवा हिसकावून घेतो आणि श्रीमंतांना फायदा देतो.” असं ते म्हणतात.
‘समोसा कॉकस’ म्हणजे नेमकं काय?
अमेरिकन काँग्रेसमध्ये (संसद) भारतीय अमेरिकन खासदारांबाबत ही गोष्ट सांगितली जाते. भारतामधील लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला ‘समोसा’ आवडतो. त्यामुळेच अमेरिकेत भारतीय वंशाच्या खासदारांना ‘समोसा कॉकस’ असं म्हटलं जातं. हा शब्द २०१८ च्या आसपास इलिनोइसचे राजा कृष्णमूर्ती यांनी अमेरिकन राजकारणातील भारतीय-अमेरिकन लोकांच्या वाढत्या प्रभावाबद्दल वापरला होता.
या कॉकसमध्ये प्रतिनिधी सभा आणि सिनेटमधील दक्षिण आशियातील सदस्यांचा समावेश असतो. समोसा कॉकसमध्ये भारतीय वंशाचे ६ अमेरिकन प्रतिनिधी आहेत. त्या वर्षी ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात असे नमूद करण्यात आले होते की, कॉकस हा शब्द समोशाला जोडला गेला आहे. त्याचा अर्थ सेनेट किंवा हाऊसमध्ये निवडून आलेल्या समविचारी किंवा समान वंश, वर्ण इत्यादी असलेल्या प्रतिनिधींचा गट असा होतो.
कोणाचे नुकसान होणार?
या कायद्यात आरोग्य आणि अन्न सहाय्य यासारख्या कार्यक्रमांच्या निधीत कपात करण्यात आली आहे. मिशिगन काँग्रेस सदस्य श्री ठाणेदार म्हणाले की त्यांच्या जिल्ह्यातील ४७% लोक मेडिकेडवर आणि २९% लोक SNAP (अन्न सहाय्य) वर अवलंबून आहेत.
ते म्हणाले, “माझ्यासाठी, या विधेयकाविरुद्ध मतदान करणे हा आतापर्यंतचा सर्वात सोपा निर्णय होता.” कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर अमी बेरा यांनी चिंता व्यक्त केली की, त्यांच्या राज्यातील २० लाख लोक या कायद्यामुळे प्रभावित होतील. त्यांच्या मते, हे विधेयक सार्वत्रिक आरोग्यसेवेसाठी आतापर्यंत केलेल्या सर्व प्रयत्नांना नष्ट करते.
अर्थसंकल्पीय तूट आणि परकीय निधीवरील कर :
काँग्रेसनल बजेट ऑफिसच्या अहवालानुसार, या कायद्यामुळे पुढील १० वर्षांत अमेरिकेची अर्थसंकल्पीय तूट ४.५ ट्रिलियन डॉलर्सने वाढू शकते. त्याचबरोबर, त्यात एक नवीन तरतूद देखील जोडण्यात आली आहे, परदेशात पाठवलेल्या रकमेवर (रेमिटन्स) १% कर लादला जाईल, ज्यातून सरकारला १० अब्ज डॉलर्स मिळण्याची अपेक्षा आहे.
नवीन सुवर्णयुग की सामाजिक असमानतेचा युग?
ट्रम्प समर्थक या विधेयकाला अमेरिकेच्या ‘नवीन सुवर्णयुगाची’ सुरुवात म्हणत आहेत. ट्रम्प यांनी याला त्यांच्या निवडणूक आश्वासनांच्या पूर्ततेचे प्रतीक म्हटले आहे आणि म्हटले आहे की, यामुळे अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते आणि ‘समोसा कॉकस’सारखे गट हे गरीब आणि गरजूंविरुद्ध उचललेले क्रूर पाऊल मानतात.