मुंबई – अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांचे मुंबईशी नाते आहे. त्यांचे पूर्वज जॉर्ज बायडेन मुंबईत इस्ट इंडिया कंपनीत कॅप्टन होते. याबाबत स्वतः बायडेन यांनीच सांगितले होते.
बायडेन 2013 मध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष होते तेव्हा मुंबईत आले होते. तेव्हा त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते की, त्यांचे एक पूर्वज इस्ट इंडिया कंपनीत काम करीत होते आणि मुंबईत राहत होते. तसेच त्यांचे कुटुंबही येथेच राहत होते. कदाचित आताही त्या कुटुंबातील पुढची पिढी मुंबईत राहत असावी.
मात्र बायडेन यांना सध्या या कुटुंबाविषयी माहिती मिळाली आहे की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
2015 मध्ये वाशिंग्टन येथे बायडेन यांनी या आठवणीला दुजोरा दिला होता. मुंबईत पाच बायडन कुटुंब राहत असल्याची माहिती बायडेन यांना देण्यात आली होती. मात्र बायडेन यांचा त्यांच्याशी संपर्क झाला होता की नाही याबाबत संभ्रम आहे. तसेच ते कुटुंब आता मुंबईत राहत आहेत किंवा नाही याबाबतही स्पष्टता नाही.