नवी दिल्ली – हॉटेल, जिम आणि आठवडी बाजाराला परवानगी द्यावी अशी मागणी करणारा प्रस्ताव दिल्ली सरकारतर्फे आज पुन्हा एकदा नायब राज्यपाल अनिल बैजल यांना पाठवण्यात आला.
सुत्रांकरवी मिळालेल्या माहितीनुसार या प्रस्तावामध्ये, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोना परिस्थिती सुधारत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच केंद्राच्या अनलॉकबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली सरकारला या आस्थापना सुरु करण्याबाबतचा अधिकार असल्याचं म्हंटल आहे.
दिल्ली सरकारने या प्रस्तवामध्ये अन्य राज्यांचे उदाहरण देताना तेथील कोरोना रुग्ण संख्या वाढत असून परिस्थिती बिघडत असताना देखील तेथे हॉटेल, जिम आणि आठवडी बाजाराला परवानगी देण्यात आली असल्याची बाब नायब राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रस्तावामध्ये दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या घटत असताना देखील या आस्थापना बंद ठेऊन दिल्लीकरांच्या उदरनिर्वाहाची साधने बंद ठेवण्यामागचा हेतू काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
तत्पूर्वी, केंद्र सरकारतर्फे २९ जुलै रोजी अनलॉक -३ बाबतच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून यामध्ये ५ ऑगस्टपासून योग संस्था आणि व्यायामशाळा सुरु करता येतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. असं असलं तरी दिल्लीमध्ये संबंधितांकडून याबाबत कोणत्याही नव्या सूचना जारी करण्यात आल्या नाहीत.
गेल्या आठवड्यामध्ये अरविंद केजरीवाल सरकारतर्फे दिल्लीत हॉटेल, जिम आणि आठवडी बाजाराला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आप सरकारचा हा निर्णय राज्यपालांनी रद्द केला. यानंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी राज्यपालांच्या निर्णयाबाबत गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली होती.