देवस्थान इनाम म्हणजे काय?

देवस्थानाचे दोन प्रकार आहेत. सरकारी देवस्थान: यांची नोंद गाव नमुना 1(क) (7) आणि गाव नमुना तीनमध्ये केली जाते.
खासगी देवस्थान : यांचा महसूल दप्तराशी संबंध नसल्याने त्यांची नोंद गाव दप्तरी नसते.

देवस्थान इनाम जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नातून, संबंधित मंदिर/मशिदीसाठी पुजा, दिवाबत्ती, साफसफाई, उत्सव यांचा खर्च भागवला जातो.

देवस्थान इनाम जमिनीच्या 7/12 सदरी भोगवटादार (मालक) म्हणून देवाचे/देवस्थानचे नाव लिहावे. त्याखाली रेषा ओढून वहिवाटदार/व्यवस्थापकाचे नाव लिहिण्याची प्रथा आहे. परंतु या प्रथेमुळे कालांतराने, 7/ 12 चे पुनर्लेखन करतांना, चुकून देवाचे नाव लिहिणे राहून जाते किंवा मुद्‌दाम लिहिले जात नाही. त्यामुळे पुढे अनेक वाद निर्माण होतात. त्यामुळे 7/12 सदरी भोगवटादार (मालक) म्हणून फक्‍त देवाचे/देवस्थानचे नाव लिहावे, वहिवाटदार/व्यवस्थापकाचे नाव इतर हक्‍कात लिहावे.

देवस्थान इनाम जमिनीचा भोगवटादार (मालक) म्हणून 7/12 सदरी पुजारी, महंत, मठाधिपती, ट्रस्टी, मुतावली, काझी यांची नावे कुळ म्हणून दाखल करु नये. देवस्थान इनाम जमिनीचे हस्तांतरण, विक्री किंवा वाटप करता येत नाही. असे झाल्यास अशी जमीन सरकार जमा केली जाऊ शकते. असा अनधिकृत प्रकार तलाठी यांना आढळल्यास त्यांनी तात्काळ तहसीलदारला कळवावे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत शासनाची पूर्व परवानगी आणि धर्मदाय आयुक्‍तांच्या मान्यतेने असे हस्तांतरण किंवा विक्री करता येते. देवस्थान इनाम वर्ग 3 ची जमीन खरेदी करण्यापूर्वी शासनाची आणि धर्मदाय आयुक्त अशा दोघांची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. अशा दोन्ही परवानगी नसेल तर नोंद रद्द करावी.

देवस्थान इनाम जमिनीत कुळाचे नाव दाखल होऊ शकते परंतु जर देवस्थानच्या ट्रस्टने कुळ वहिवाट अधिनियम कलम 88 ची सुट घेतली असेल तर अशा कुळास कुळ वहिवाट अधिनियम 32 ग प्रमाणे जमीन विकत घेण्याचा अधिकार नसतो. देवस्थान इनाम जमिनीला वारसांची नोंद होऊ शकते, परंतु येथे जन्माने वारस ठरण्याऐवजी मयतानंतर प्रत्यक्ष पुजाअर्चा करणारा वारस ठरतो. म्हणजेच पदामुळे मिळणारा उत्तराधिकार हे तत्त्व येथे लागू होते.

एखाद्या मयत पुजाऱ्याला चार मुले वारस असतील तर पूजाअर्चा व वहिवाटीसाठी पाळी पध्दत ठरवून द्यावी, असे अनेक न्यायालयीन निर्णयात म्हटले आहे. मठाचा प्रमुख/पुजारी, अविवाहीत असला किंवा त्याला वारस नसल्यास तो त्याच्या मृत्यूच्या आधी शिष्य निवडून त्याला उत्तराधिकार देऊन जातो. परंतु या जमिनीचे वारसांमध्ये वाटप होत नाही तसेच एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाकडे हस्तांतरण होत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.