मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या आरोपांनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. यावर भाजप नेते निलेश राणे यांच्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप नोंदवित तीन प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्री खुलासा करतील का? आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील शरद पवारांना भेटले. ही भेट खाजगी की कार्यालयीन ?, पोलीस गणवेशात भेट घेण्याचे औचित्य काय?, हा प्रकार प्रशासकीय शिष्टाचाराचा भंग म्हणावा का ? मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांचं स्पष्टीकरण द्यावं.
दरम्यान राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एका राजकीय नेत्याला अशा प्रकारे भेटण्यामागचा उद्देश लोकांना समजला पाहिजे, असंही आंबेडकर म्हणाले. आंबेडकर यांच्याआधी निलेश राणे यांनी देखील या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
निलेश राणे म्हणाले होते की, काय चाललंय महाराष्ट्रात??? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी?? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशांनी पोलिसांवर विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं, अस प्रश्न त्यांनी विचारला आहे.