पुणे-सातारा महामार्गाची नक्‍की समस्या काय?

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दै. “प्रभात’चे 20 प्रश्‍न

– श्रीनिवास वारुंजीकर

पुणे – केंद्र सरकारच्या सुवर्ण चतुष्कोन योजनेतील मुंबईहून बेंगळुरूला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (जुना क्र. 4) अर्थात आशियाई महामार्ग क्र. 47 (ग्वाल्हेर ते बेंगळुरू) हा सध्या सर्वाधिक चर्चेत असून खेड-शिवापूर ते नीरा पुलापर्यंत असलेल्या खड्डयांसंदर्भात महामार्ग प्राधिकरण काहीच का करत नाही, असे चित्र सध्या उभे रहाते आहे. महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय वारजे उड्डाणपूल येथे असून त्या अंतर्गत देहुरोड ते शेंद्रे-सातारा हा 142 किमीचा भाग येतो. या रस्त्याच्या सहापदारीकरण योजनेतील अनेक रखडलेल्या कामांना वारंवार मुदतवाढ देऊनही, ही कामे पूर्ण का होत नाहीत आणि आता पाऊस संपून अनेक दिवस होऊनही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत त्वरेने कार्यवाही का होत नाही, याबाबत नेहमी प्रवास करणाऱ्या महामार्ग वापरकर्त्यांशी बोलून दै. “प्रभात’ने 20 प्रश्नांची प्रश्नावली प्राधिकरणाकडे पाठवली आहे. आता यावर काय कार्यवाही होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रश्नावली साधारणपणे अशी आहे…

1 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या देहूरोड ते शेंद्रे-सातारा या 143 किमीच्या अंतरात प्रलंबित असलेली कामे कोणती आहेत?
2 या 143 किमीच्या अंतरात प्रलंबित उड्डाण पूल खेड शिवापूर, चेलाडी, नसरापूर, किकवी आणि सारोळा पूर्ण केव्हा होणार आहेत?
3 वरील चारही ठिकाणचे उड्डाण पूल प्रलंबित राहण्यामागील कारणे काय आहेत?

4 या 143 किमीच्या अंतरात ज्यांच्या जमिनींचे अधिग्रहण सरकारने केले, त्या सर्व जमिनमालकांना योग्य प्रकारे आणि योग्य वेळी नुकसान भरपाई दिली गेली आहे का?
5 या सर्व अंतरात, विशेषत: खेड-शिवापूर ते सारोळा पूलदरम्यान रस्त्याचा दर्जा सातत्याने वादग्रस्त का रहात आहे?
6 खेड-शिवापूर ते सारोळा पुलादरम्यानची कामे स्थानिकांच्या विरोधामुळे प्रलंबित राहिली, असे प्राधिकरण म्हणू शकते का?
7 या 143 किमीच्या अंतरातील रस्त्यांच्या विकासकामांना विरोध म्हणून स्थानिक, मुंबई उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयात काही याचिका प्रलंबित आहेत का?
8 टोलची रक्कमवसुली महागाई निर्देशांकाशी जोडण्यामागे प्राधिकरणाची/सरकारची भूमिका काय आहे?
9 दोन टोल नाक्‍यांमधील सर्वसाधारण अंतर 50 ते 55 किमी असताना, प्रत्येक ठिकाणी टोलच्या रकमेत फरक का असतो?
10 सक्तीने टोल वसुली करुनही, रस्त्यांचा दर्जा आणि मेंटेनन्सची कामे वेळच्यावेळी का केली जात नाहीत?
11 देहूरोड ते शेंद्रे-सातारा या 143 किमीच्या अंतरात किती आणि कोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत? या कॅमेऱ्याचे नियंत्रण आणि माहिती संकलन कोण करते? यातील सर्व उपकरणे सुरू आहेत का?
12 सहापदरीकरण काम पूर्ण कधी संपवायचे होते? त्या कामाला कितीवेळा मुदतवाढ देण्यात आली होती? मुदतवाढ देऊनही हे काम अद्याप प्रलंबित का आहे?
13 फ्लाय-ओव्हर्स, अंडरपास, ग्रेड सेपरेटर्स, हायवे-क्रॉसिंग्ज, वाहतुकीला अडथळे आणणारी होर्डींग्ज, फूटपाथ, डिव्हायडर्स आणि स्ट्रीट लाईटस याविषयीची अनेक कामे वेळच्यावेळी होत नाहीत. त्याबद्दल काय सांगता येईल?
14 वर्ष 2000 पासून आज अखेरचा ट्राफिक सेन्सस रिपोर्ट हवा आहे.
15 देहूरोड-कात्रज 40 किमी परिसरातील प्रलंबित कामांविषयी काय सांगता येईल?
16 खंबाटकी घाटातील खामजाई मंदिर हलवण्याविषयी काय स्थिती आहे?
17 खंबाटकी घाटातील सातारा-पुणे मार्गिकेमधील बोगदा नक्की तीन लेन्सचा होणार आहे का? की येथे अन्य काही योजना आहे?
18 देहुरोड-शेंद्रे सातारा मार्गावर गेल्या तीन वर्षात झालेल्या अपघातांचा तपशील आहे का?
19 यावर्षीचा पाऊस थांबूनही डायव्हर्जजवळचा रस्ता दुरुस्त करण्यात चालढकल का करण्यात येत आहे?
20 महामार्गाची कामे 100 टक्के पूर्ण झाली, असे नक्की केव्हा म्हणता येऊ शकेल?

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.