पंढरीच्या वारीबाबत यंदा काय निर्णय?

राज्यभरात उत्कंठा : चैत्र शुद्ध दशमीला प्राथमिक बैठक

पुणे – यावर्षीही आषाढी वारीबाबत काय निर्णय होणार याबाबत उत्कंठा निर्माण झाली असून, चैत्र शुद्ध दशमीला संत श्री ज्ञानेश्वर महाराज दिंडी समाज संघटने’ची दरवर्षी पंढरपुरात बैठक असते. तर, इंग्रजी महिन्याप्रमाणे 22 एप्रिलला ही बैठक होणे अपेक्षित असून, ती झाली तर यावर प्राथमिक चर्चा होऊ शकणार आहे.

यंदा 20 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे तिथीचा विचार करून 2 जुलै रोजी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणे अपेक्षित आहे. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता याबाबत कोणता निर्णय होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मागील वर्षीही राज्य सरकारच्या विनंतीनुसार आणि एकमताने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका मोठा सोहळा न करता आणि पायी न नेता त्या मोजक्‍याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपुरी नेण्यात आल्या. यंदाही करोनाची परिस्थिती जास्त दाहक आहे. तसेच लॉकडाऊन’ची शक्‍यता देखील दाट आहे.

पालखी सोहळा जुलैमध्ये आहे. या दोन-तीन महिन्यांत परिस्थिती काय असेल त्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया संत श्री ज्ञानेश्वर महाराज दिंडी समाज संघटने’चे प्रमुख मारूती महाराज कोकाटे यांनी सांगितले. मात्र, दरवर्षी चैत्र सुद्ध दशमीला होणाऱ्या बैठकीबाबत अनिश्‍चितता आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेटून बैठक होऊ शकणार नाही, तर अन्य पर्यायांचा विचार येत्या काही दिवसांत केला जाईल, असे कोकाटे म्हणाले. कुंभमेळा जसा शिस्तीत सुरू आहे, तशी व्यवस्था वारीसाठी करता येईल का, किंवा लस घेतलेल्यांनाच परवानगी देऊन किमान 100 जणांचा समावेश करून पायी वारी करता येईल का याविषयी विचारमंथन सुरू आहे,’ असे राजाभाऊ चोपदार यांनी सांगितले.

तर परिस्थितीनुसार बैठकीत निर्णय होईल’ असे बाळासाहेब आरफळकर यांनी सांगितले. प्रशासनाचे म्हणणे आणि लोकभावना दोन्ही विचारात घेऊन निर्णय घेण्यात येईल,’ असे मत शितोळे सरकार यांनी मांडले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.