राजगुरूनगरात राजकीय पक्षांचा अजेंडा काय?

नगरपरिषद निवडणुकीसाठी केवळ तयारी; मात्र जोश नाही : शहर विविध समस्यांनी ग्रासलेले

– रामचंद्र सोनवणे

राजगुरूनगर  -राजगुरूनगर नगरपरिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली असली तरी त्यात अजून जोश आलेला नाही. नगरपरिषदेची प्रभाग रचना, आरक्षण आणि शहरातील समस्यांचा विळखा यामुळे पुढील निवडणुकीत कणखर नेतृत्व कोण व कोणता पक्ष करणार.

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी निवडणुकीत उतरणाऱ्या पक्षाचा अजेंडा काय असणार? प्रभाग रचना आणि आरक्षण कसे आणि कधी होणार? याही पुढे नगरपरिषदेत रिक्‍त असलेली पदे कधी भरणार? ती निवडणुकीपूर्वी भरली जाणार का? ती भरण्यासाठी निवडणुकीपर्यंत नागरिकांना कामांसाठी प्रतिक्षा करावी लागणार. याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

राजगुरूनगर नगरपरिषदेच्या नगरसेवकांची मुदत संपून जवळपास वर्षे होत आले. करोनामुळे राज्यात होणाऱ्या सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या. राजगुरूनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली. मतदारयादी प्रसिद्ध झाली; मात्र करोनाचे मोठे संकट आले आणि निवडणूक थांबली. राजगुरूनगर नगरपरिषदेवर सध्या प्रशासक आहे.

पाणी आणि बंदिस्त गटार योजना अर्ध्यावर ठप्प आहेत. अर्धवट खोदलेले रस्ते तसेच आहेत. स्वच्छ मुबलक पाणी मिळत नाही. वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध सेवा या पूरक नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नगरपरिषदेत अधिकारी नाहीत, त्यामुळे नागरिकांची कामे नोंदी प्रलंबित आहेत. कर संकलन होत नाही. त्यामुळे नगरपरिषदेची आर्थिक घडी विस्कटलेली आहे.

शहर विकास आघाडी होणार?
करोनाचे संकट आल्याने राजगुरूनगर नगरपरिषदेची निवडणूक लांबणीवर गेली. फेब्रुवारी2020 ला आरक्षण सोडत झाली होती. यात अनेक विद्यमान नगरसेवकांची संधी हुकली होती तर अनेक इच्छुकांना संधी मिळाली होती. निवडणुकीची तयारी सुरू असताना करोना वाढला आणि निवडणूक पुढे ढकलल्या.

आता शासनाने एक प्रभाग दोन नगरसेवक असा आदेश काढल्याने संधी हुकलेल्या इच्छुकांना पुन्हा संधी प्राप्त होणार आहे. पक्षीय राजकारण येथील निवडणुकीत होणार आहे असे असले तरी एखादी शहर विकास आघाडी होण्याची दाट शक्‍यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे. निवडणूक जवळ आल्याने आता नव्या जोमाने इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर लक्ष केंद्रित केले आहे

कचराप्रश्‍न सोडविण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश
पहिल्याच निवडणुकीत अपक्षांच्या हाती आलेली सत्ता सत्तानंतर भाजपने मिळवली होती. सत्ता काबीज केल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी पक्षाच्या माध्यमातून चासकमान धरणातून राजगुरूनगरला पाणी, बंदिस्त गटार योजना आणली. अंतर्गत रस्ते आणि शहरातील कचरा व्यवस्थापन केले. कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जागे अभावी अपयश आले.

विकासकामांमुळे भाजप आगामी निवडणुकीत बाजी मारणार का? आमदार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस नगरपरिषदेवर झेंडा फडकविणार का? आणि या दोघांच्या चुरशीच्या लढाईत कॉंग्रेस, शहर विकास आघाडी कितपत बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

सर्व पक्ष स्वबळावर लढणार?
राजगुरूनगर नगरपरिषदेची निवडणूक राजकीय पक्ष स्वबळावर लढविणार असल्याचे चित्र आहे. तालुक्‍यात महाविकास आघाडीत बिघाडी आहे, त्यामुळे येथील निवडणुका स्वबळावरच होणार यात शंका नाही. महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादीचा वाद खेड पंचायत समितीच्या इमारतीवरून विकोपाला गेला आहे.

त्यातच शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे अकाली निधन झाल्याने तालुक्‍यातील शिवसैनिक एकाकी पडला आहे. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस तालुक्‍यात बॅकफूटवर आहे. त्यांच्याकडून जरी स्वबळाची भाषा असली तरी राष्ट्रवादी आणि भाजपची पकड जोरदार असल्याने कॉंग्रेस कितपत टक्‍कर देईल हे निवडणुकीत पाहायला मिळेल.

भावी नगरसेवकांच्या सोशल मीडियावर घिरट्या
राजगुरूनगर नगरपरिषदेची निवडणुकीचे बिगुल वाजण्याकडे सर्वांचे लक्ष आहे. अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. भावी नगरसेवक म्हणून सोशल मीडियावरून विविध पोस्ट व्हायरल करीत आहेत;

मात्र सामाजिक समस्या सोडविण्याकडे सध्यातरी कोणाचाच पुढाकार नसल्याचे चित्र आहे. त्यातच एक प्रभाग दोन नगरसेवक अशी नवीन पद्धत लागू झाल्याने प्रभाग रचना कशी असेल आणि आरक्षण काय राहणार याकारणास्तव इच्छुकांच्या तोफा सध्या थंडावल्या आहेत.

कचरा समस्या “जैसे थे’
सध्यातरी इच्छुकांची पाहिजे तशी तयारी नाही. नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष आहे. जुने बोटावर मोजण्याइतके नगरसेवक नागरिकांची रखडलेली कामे करीत असले तरी त्याचेप्रमाण नगण्य आहे. जुन्यामध्ये पुढे संधी कोणाला मिळणार हे आरक्षणांती समजणार असल्याने जुने, इच्छुक यांच्यातील चुरस दिसत नाही.

यापूर्वी असलेल्या नगरसेवकांच्या माध्यमातून नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषदेची बांधणी करण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. पाणी, गटार योजना मंजूर झाल्या. अंतर्गत रस्ते काही प्रमाणात झाले; मात्र कचऱ्यासाठी जागेची समस्या सुटू शकली नाही.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.