स्वाभिमान म्हणजे काय असतो पवारसाहेब ?

शिवसेनेचा शरद पवारांना खोचक सवाल

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून इतर पक्षात जाणाऱ्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, अशी टीका करणाऱ्या शरद पवार यांना शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. स्वाभिमान म्हणजे काय असतो पवारसाहेब, असा खोचक सवालही शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून विचारण्यात आला आहे. उदयनराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये पक्षाला रामराम केला आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी या नेत्यांचा समाचार घेतला होता. पळपुटेपणा दाखवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. कोणी पक्ष सोडून गेले त्याची काळजी करू नका. पक्ष सोडून जाणाऱ्यांना स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते.

शिवसेनेने पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब? स्वत: पवारसाहेबांनी स्वाभिमानाच्या मुद्द्यावर सोनियांबरोबर वाद केला. कॉंग्रेस पक्षात बंड केले. मात्र त्याच सोनियांबरोबर मागील दीड-दोन दशकांपासून त्यांचे राजकीय ‘गुप्तगू’ सुरु आहे, याची आठवण शिवसेनेने पवारांना करून दिली.  तसेच शरद पवार यांनी शिवसेना किंवा भाजपमधील काही मंडळी कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीत सामील करून घेतली तेव्हा या मंडळींनी स्वाभिमानाचे कोणते शिखर जिंकले होते? तेव्हाही स्वाभिमान वैगेरे शब्दाची ऐशीतैशी झाली होती. किंबहुना आजच्या काळात कोणत्याही राजकारण्याने स्वाभिमान हा शब्दच वापरू नये. कारण, सध्याच्या राजकारणात सोय आणि तडजोड महत्त्वाची मानली जाते. तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. त्यामुळे आता स्वाभिमानाचे नाव घेण्यात अर्थ नाही. अखेर वळणाचे पाणी वळणालाच गेले, असे अग्रलेखात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)