काल-परवापर्यंत आम्ही फक्त झोपायलाच घरात असतो, असे म्हणणाऱ्या खूप मोठया लोकांचा समूह लॉकडाऊनमुळे पूर्णत: घरात आहे. अशावेळी सहजच मनात विचार येऊन जातो. बाल्कनीत एखादा झोपाळा हवा होता किंवा हॉलमध्ये आरामखुर्ची. निदान पाय पसरून बसण्याकरिता जराशी मोकळी जागा तरी. या अशा खूप छोट्या-छोट्या त्रुटी नकळत घरात वावरताना जाणवतात. त्याचे महत्व देखील लोकांना कळायला लागले आहे. आम्ही आर्किटेक्ट क्लायंटला अगदी मनापासून घराची संरचना, ठेवण व जागेचा विस्तार वा बदल समजावण्याचा प्रयत्न करतो.
बऱ्याचदा क्लायंट कुणाच्यातरी सांगण्यावरून किंवा तुलनात्मक दृष्टीकोनातून या गोष्टी समजून घेत नाहीत आणि दिखाऊ प्रवृत्ती व बडेजावमध्ये अडकतात. घरातील गोष्टी किंवा बदल साधेसेच असतात पण आपल्या जीवनात त्याचा मोठा प्रभाव पडतो. अगदी साधं उदाहरण म्हणजे खिडकीची जागा, आकार. मात्र, त्यातही नंतर फेरफार होतो. घराची संरचना करताना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश व हवा घरात खेळेल याची काळजी घ्यावी. नैसर्गिक वायुविजन हे कृत्रिम पेक्षा जास्त सरस आहे. जागेअभावी खूप मोठे अंगण शक्य नाही तर किमान प्लॉटमध्ये जास्तीत जास्त बांधकामाच्या अट्टाहासापेक्षा पुरेसे बांधकाम आणि छोटीशी बाग करता येईल, अशी जागा ठेवावी. छोट्यांना खेळायला टेरेस, मोठ्यांना बैठक, व वयोवृद्धांना रमण्याकरिता छोटीशी बाग हवीच हवी.
अमृता बोठे,वास्तुविशारद, नगर. संपर्क : 9850260101
देशावर करोना महामारीचे भयंकर संकट आहे. त्याला सर्वांना मिळून तोंड द्यायचे आहे. त्यासाठी सरकारने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. अतिनिकडीच्या कामाशिवाय कोणीही घराबाहेर जाऊन करोनाला आमंत्रण देऊ नये. स्वतःची, आपल्या कुटुंबाची, समाजाची काळजी घ्यावी. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या दृष्टीने राज्य सरकारने सांगितलेले नियम व कायद्याचे काटेकोर पालन करावे. आपण सुरक्षित, तर देश सुरक्षित राहील, हे सर्वांनीच ध्यानात घ्यायला हवे. सर्वांनी फिजिकल डिस्टन्स पाळावा, गर्दीत जाणे टाळावे.
घरात बसून वेळ जात नाही, मग काय करावे? असाही प्रश्न अनेकांना असतो. घरात बसल्यानंतर अध्यात्मिक वाचन करावे, शिवचरित्र वाचावे. ध्यान करावे, योगा करावा. करोनाला हरवण्यासाठी पोलीस, सफाई कर्मचारी, डॉक्टर खूप मेहनत घेत आहे. त्या सर्वांना सहकार्य करा. तसेच ज्यांना शक्य होईल, त्यांनी गरजूंना मदत करावी. भुकेलेल्याला अन्न द्या तहानलेल्यांना पाणी द्या. सर्वानाच करोनाविरुद्ध असलेली ही लढाई लवकर जिंकायची आहे. लवकरच करोनाला सर्व मिळून हरवू. करोनाला हरवणे शक्य आहे.
साईप्रसाद प्रमोद , कुंभकर्ण शिवचरित्र व्याख्याते, कोल्हार, ता. राहाता. संपर्क : 9011890279