काय म्हणतात नगरकर

प्रथमत: करोना योध्यांना परमेश्‍व खूप शक्ती देवो, अशी माझी प्रार्थना आहे. पोलीस, डॉक्‍टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी यांना धन्यवाद देण्यासाठी माझ्याकडे शब्दांचा दुष्काळ आहे. करोनासोबत लढण्यासाठी त्यांना कोठून एवढी शक्ती व प्रेरणा मिळते, हे समजण्यापलिकडचे आहे. या सर्वांना भविष्यात स्वातंत्र्ययोद्‌ध्यांप्रमाणे प्रेम मिळेल, असे मला वाटते. करोनाशी झुंज देताना सरकार वारंवार नागरीकांना लॉकडाऊनच्या सूचना देत होते. जीवनावश्‍यक वस्तुंची खरेदी-विक्री करण्याशिवाय अन्य कोणत्याही कारणासाठी बाहेर पडू नये, असेही वारंवार सांगत होते. तथापि, नागरीकांनी ही सूचना फारशी गांभीर्याने घेतलीच नाही. खरे पाहता, अशावेळेस किमान बाहेरच्या व्यक्तिंशी कमीत-कमी संपर्क ठेवायला हवा होता.

ही सुरक्षितता आपल्याच परिवाराच्या हिताची होती. मात्र, दुर्देवाने आपणच हवे तेवढ्या जबाबदारीने वागलो नाहीत, असेच म्हणावे लागते. दुसरीकडे शासकीय पातळीवर परराज्यांतील कामगारांना त्यांच्या राज्यांत पाठविताना खूप उशिर केला. एक मेपूर्वीच त्याचे नियोजन व्हायला हवे होते. असंख्य कामगार लहान मुलांना घेऊन हजारो किलोमीटर अक्षरश: पायी चालत गेले. कोणालाही त्याचे दु:ख वाटावे, असेच ते चित्र होते. विशेष म्हणजे त्यातही राजकारण शिरले, हे आणखी मोठे दुर्देव. आता राजकीय नेत्यांनीही काही बंधने पाळावित. सर्वच समाजाने देखील एकजुटीने हे संकट परतावण्यासाठी काम करावे.
विपूल वाखुरे
सामाजिक कार्यकर्ता, नगर संपर्क: 9665015555.

 

करोनाच संकट अजुनही कमी होताना दिसत नाही. या परिस्थितीत स्वत:च स्वत:ची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये किंवा जास्त जणांनी एकत्र येऊन बसणे टाळलेच पाहिजे. करोनाच्या या संकटकाळात पोलीस, डॉक्‍टर, महसूल प्रशासन, फार्मासिस्ट यांची कामगिरी खूप मोलाची ठरली. स्वत:च्या जीवावर उदार होऊन त्यांनी खूपच मेहनत घेतल्याने करोना रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण मिळविता आले.

सध्या खेड्यांत करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे गावंखेडी देखील सुरक्षित राहिलेली नाहीत, असे लक्षात येते. बाहेरुन येणाऱ्या नागरीकांना संस्थात्मक विलगीकरण केल्याशिवाय तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी केल्याखेरीज त्यांना गावात प्रवेश येऊच देऊ नये. तसेच त्यात राजकारण देखील होऊ नये. नगर जिल्ह्याची वाटचाल सातत्याने रेडझोनकडे सुरु आहे. सर्वांनीच या काळात आपापल्या घरी किंवा आहे त्या ठिकाणीच राहिल्यास धोका कमी होईल. हातावर पोट असलेली माणसं या काळात जास्त होरपळली. सरकारने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात पुन्हा रोजगार कधी सुरु होईल, याची अजून शाश्‍वती नाही. त्यांच्यासाठी सर्वांनीच काहीतरी मदत करण्याची गरज आहे.
अक्षय शहाजी गायकवाड
वडगाव तांदळी, ता. नगर. संपर्क : 8669056400

Leave A Reply

Your email address will not be published.