हॉर्न-प्लीज-ओके काय आहे?

पुणे – भारतात व्यावसायिक वाहतूक करत असलेल्या (पब्लिक कॅरिअर) प्रत्येक वाहनाच्या – ट्रक, टेम्पो यांच्या पाठीमागच्या बाजूस “हॉर्न-ओके-प्लीज’ ही अक्षरे आढळतातच. अशी अक्षरे प्रत्येक वाहनावर लिहिण्याविषयी कायदेशीर बंधन असल्याचा उल्लेख कुठल्याही मोटार वाहन कायद्यात नसल्याचे दिसून येते. वर्ष 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने मोटर व्हेईकल्स कायदाच्या कलम 125 (1) आदेशाद्वारे, अशा प्रकारे व्यावसायिक वाहनांच्या पाठीमागे कसल्याही घोषणा रंगवण्यास बंदी केली आहे. तर जाणून घेऊया….

 काय आहे हे हॉर्न-प्लीज-ओके?
त्या शब्दामध्ये “ओके’ हा शब्द अधिक मोठा आणि ठळक अक्षरात दिसतो. मागील वाहनाने सुरक्षित अंतर राखावे असे त्यांना सांगायचे असते. हॉर्न व प्लीज हे शब्द लहान अक्षरांत असतात. मागील वाहनाला ओव्हरटेक करावयाचा असल्यास, त्यांनी आपल्या वाहनाचा हॉर्न वाजवून पुढे जाण्याची वाट मागावी, असा सामान्य संकेत आहे.

पूर्वीच्या काळी सर्वच रस्ते हे एकपदरी होते, ज्यावरून ओव्हरटेक करणे सोपे नसायचे. तेव्हाच्या ट्रक्‍सना मागून एखादी लहान गाडी ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत असेल, तर ते कळायला मार्ग नसायचा. परिणामी अपघात होण्याची शक्‍यता असायची. त्यामुळे एक नवीन शक्कल लढवण्यात आली ती म्हणजे हॉर्न-प्लीज हे दोन शब्द लिहिण्यात आले. दोन्हींच्या मधे ओके लिहून या शब्दाभोवती बल्ब लावला जायचा. म्हणजे मागून येणाऱ्या ड्रायव्हरने हॉर्न वाजवायचा आणि ट्रक ड्रायव्हरने ओके शब्दावरील बल्ब पेटवून त्याला ओव्हरटेकची परवानगी द्यायची.

आणखी एका संकल्पनेनुसार, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंधनाची कमतरता असल्याने ट्रक्‍स केरोसीनवर (रॉकेल) चालवले जायचे. लहानशा अपघातातही अशा ट्रकचा स्फोट व्हायचा. त्यामुळे सावधानी बाळगण्यासाठी ट्रक्‍सच्या मागे “ऑन केरोसिन (ओके)’ असे लिहिले जायचे.

आणखी एका अनधिकृत मान्यतेनुसार, ही टाटा कंपनीमार्फत चालवली गेलेली एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती, जी त्यांनी त्यांच्या “ओके’ या साबणाच्या प्रसारासाठी राबवली होती. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्याकाळी ट्रक निर्मितीमध्ये टाटा कंपनीचे वर्चस्व होते. त्यामुळे कंपनीने सादर केलेल्या नव्या “ओके’ साबणाच्या प्रोडक्‍टचा लोगो म्हणजे कमळाच्या फुलाचे चित्र होते. आजही हे चित्र अनेक ट्रकवर दिसून येतेच.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here