हडपसर – प्रामाणिकपणा मानवातील सद्गुण असला तरी तो सरसकट सर्वांमध्ये क्वचितच दिसून येत असतो. तात्पुरत्या फायद्यासाठी अनेक लोक प्रामाणिकपणाचा गाशा गुंडाळून ठेवत आपले हेतू साध्य करीत असतात. परंतु याला काही जण अपवाद देखील ठरतात. अशांच्या प्रामाणिकपणाची दखल नक्कीच घेतली जात असते. याचेच एक उदाहरण सध्या हडपसरमध्ये पाहायला मिळाले. एका तरुणानं लाखोंचा ऐवज प्रामाणिकपणे परत दिला आहे.
हडपसरमध्ये 15 नंबर मारुती मंदिर समोर भारतीय जनता पक्ष विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संदिप दळवी यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात तसेच कार्यालयाच्या बाहेरील ओट्यावर अनेजण बसत असतात. रविवारी संध्याकाळी दळवी यांचे लहान भाऊ संतोष रामचंद्र दळवी हे त्यांच्या काही मित्रांसोबत जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेरील ओट्यावर बसले होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, दुचाकीला एक बॅग अडकवलेली दिसत आहे.
संतोष यांनी गाडीजवळ जावून ती बॅग पाहिली असता त्या बॅगेत काही रोख रक्कम, पासपोर्ट, व्हिसा, ओळखपत्र ,औषधे आणि मोबाईल आढळून आले.कोणी तरी जवळचा ओळखीचा असेल किंवा बॅगेत असलेल्या मोबाईल नंबरवर समोरून संपर्क होईल. या हेतूने संतोष दळवी यांनी रात्री उशिरापर्यंत वाट पाहिली, मात्र ती बॅग व त्यातील ऐवज घेण्यास कोणीही आले नाही किंवा तसा संपर्क झाला नाही. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे विधानसभा अध्यक्ष संदिप दळवी यांच्या मदतीने संतोष दळवी यांनी हडपसर पोलिसांना संपर्क साधून ती बॅग सोमवारी सकाळी पोलिसांच्या ताब्यात दिली.
दरम्यान, पोलिसांनी संपर्क साधून ज्या व्यक्तीची बॅग आहे. त्याला बोलावून घेत खात्री करून ती बॅग त्यातील संपूर्ण ऐवजासह संतोष दळवी यांच्या हस्ते परत केली.संतोष ने प्रामाणिकपणे हा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज परत केला. त्यामुळे संतोष दळवींच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होतंय.
बॅगेत महत्वाची कागदपत्रे आणि लाखों रुपयांची रोकड
- पासपोर्ट, व्हिसा,युनायटेड अरब एमिरात सिटीझनशीपचे ओळखपत्र, ड्रायव्हींगचे लायसन्स.
- भारतीय चलनाच्या नोटा ३,५९,५००/- रुपये इतकी रक्कम.
- सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, एक चष्मा आणि मेडीसीन व पांढऱ्या रंगाचा चार्जर असे साहित्य होते.