काय आहे “एशियन हेझ’ अथवा एशियन ब्राऊन क्‍लाउड?

नवी दिल्ली: चांद्रयान-2 सह अनेक अवकाशयानांनी पाठवलेली भारताच्या नकाशाची अथवा दक्षिण आशियाई भूभागाची छायाचित्रे बारकाईने पाहिली असता, या बहुतांश छायाचित्रांमध्ये एक धुळीचा मोठा ढग या भूभागाला व्यापून उरलेला दिसतो. आजवर सहसा या ढगाविषयी कोणाला फारशी माहिती नाही. मात्र, दिल्लीतील एका अवकाश संशोधन करणाऱ्या अभ्यासकांच्या गटाने याविषयी माहिती दिली असून हा ढग म्हणजे द इंडियन ओशन ब्राऊन क्‍लाऊड अथवा एशियन ब्राऊन म्हणजे प्रदूषणामुळे निर्माण झालेली संपूर्ण दक्षिण आशिया खंडाला व्यापणारी धुळीची किंवा प्रदूषकांची एक चादर किंवा आच्छादन आहे. प्रामुख्याने या आच्छादनाचा आवाका भारतीय उपखंड म्हणजे हिंदी महासागराचा उत्तरी भाग, भारत आणि पाकिस्तान इतका असतो.

उपग्रहांमार्फत घेतल्या जाणाऱ्या छायाचित्रांचा अभ्यास केल्यास ही चादर किंवा हे आच्छादन वरील भागांवर अधांतरी तरंगत असलेल्या एका विटकरी रंगाच्या डागाप्रमाणे दिसते. म्हणून ब्राऊन हा शब्द वापरला जातो. हा प्रकार दरवर्षी जानेवारी ते मार्च या काळादरम्यान दिसून येतो. या संज्ञेचा प्रथम वापर युनेप अर्थात युनायटेड नेशन्स एन्व्हायर्मेंट प्रोग्राममार्फत राबविण्यात आलेल्या इंडियन ओशन एक्‍स्प्रिमेंटच्या अहवालामध्ये केला गेला होता.

वर दिलेल्या प्रयोगामध्ये वर्ष 1999 मध्ये अशियन क्‍लाऊड्‌स सर्वप्रथम निदर्शनास आले आणि या परिस्थितीमुळे काय संभाव्य परिणाम होतील याबाबत पुढे युनेपच्या अहवालामध्ये सर्वप्रथम हे निरीक्षण मांडण्यात आले. परंतु हा प्रकार फक्त आशियायी खंडापुरता मर्यादित नसल्याचा भारतीय शास्त्रज्ञांनी आक्षेप घेतल्यामुळे या संज्ञेचं नाव बदलून ऍटमॉस्फेरीक ब्राऊन क्‍लाऊड असे ठेवण्यात आले. या क्‍लाऊडच्या निर्मितीमागे इंधन ज्वलनातून निर्माण होणारे प्रदूषण आणि प्रदूषकं, धूळ, इंधनाच्या अपुऱ्या ज्वलनामुळे निर्माण होणारे प्रदूषण आणि प्रदूषकं, इतर पारंपरिक इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणारे प्रदूषण म्हणजे बायोमास, लाकूड यांच्या ज्वलनामुळे होणारे प्रदूषण, कारखान्यांमुळे, जंगलात मनिर्माण होणाऱ्या वणव्यांमुळे निर्माण होणारे प्रदूषण अशी विविध कारणं आहेत. या आच्छादनाचा थर पृष्ठभागापासून तीन किमी इतक्‍या उंचीपर्यंत असतो. या धुळीच्या चादरीमुळे 20 लाख लोकांचा दरवर्षी मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आलेलं. याव्यतिरिक्त पावसाळ्याचे बदलते स्वरूप आणि प्रमाण तसेच मान्सून उशिरा येण्यामागे काही प्रमाणास ही प्रदूषणाची झालर कारणीभूत असते. सागरात उत्पन्न होणाऱ्या चक्री वादळांची तीव्रता वाढण्यामागेसुद्धा हे आच्छादन कारणीभूत असते.

तसेच नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीत परतीचा मान्सून आपल्यासोबत पाऊस आणत नाही किंवा तसे हवामान निर्माण होत नसल्यामुळे हवेतील प्रदूषण तसेच राहून त्याची विल्हेवाट लागत नाही. जर पाऊस पडला तर हवेतील या प्रदूषणाच्या विल्हेवाटीचं काम नैसर्गिकरित्या आपोआपच होत असतं. या आच्छादनाच्या अस्तित्वाबद्दल अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नॅशनल एरॉनॉटिक्‍स ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात नासानेदेखील केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)