पालिका निवडणुकीत प्रभाग बदलले, तर भाजपचे काय?

राजेंद्र पंढरपुरे

पुणे – अपेक्षेप्रमाणे दिवाळी संपताच महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आगामी निवडणुकीतील कळीचा मुद्दा प्रभाग रचना हाच राहाणार असून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात यावरून पहिला खटका उडाला आहे.

 

पुणे महापालिकेच्या निवडणुका एक सदस्य वॉर्डपद्धत आणि प्रभाग पद्धत अशा दोन प्रकारांत झाल्या आहेत. यात सातत्य नसल्याने इच्छुकांची पर्यायाने कार्यकर्त्यांची पंचाईत झाली. काहींच्या परिश्रमावर पाणी पडले आणि त्यांना मैदान सोडावे लागले, असे अनुभव आहेत.

 

सन 1997 मध्ये एकसदस्य पद्धतीने निवडणुका झाल्या, तर 2002 साली तीन सदस्यांचा एक प्रभाग, सन 2007 मध्ये पुन्हा एकसदस्य वॉर्ड पद्धत आणि 2012 साली दोन सदस्यांचा प्रभाग या पद्धतीने निवडणुका झाल्या. चार सदस्यांचा प्रभाग अशा पद्धतीने सन 2017 मध्ये निवडणूक झाली.

 

भाजप आणि शिवसेना युती सरकारने चार सदस्यांचा प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय केला. पण, युतीमधील घटक असलेले भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष पुणे महापालिकेची निवडणूक मात्र स्वतंत्रपणे लढले. सततच्या पराभवाने कॉंग्रेस पक्ष खचलेल्या मनःस्थितीत होता आणि पुण्यात कॉंग्रेस संघटना विस्कळीत होती. याचा फायदा उठवण्यासाठी भाजपने चार सदस्यांचा मोठा प्रभाग करून कॉंग्रेसची कोंडी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस संघटना विखुरलेली होती, शिवसेनाही भक्कमपणे संघटीत नव्हती. संघटीत भाजपने त्या परिस्थितीचा राजकीय लाभ उठविला. महापालिकेवर सत्ता प्रस्थापित केली.

 

दरम्यान, आता दोन सदस्यांचा प्रभाग केल्यास भाजपला रोखता येईल, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. चार सदस्य प्रभागात एक-दोन उमेदवार कमकुवत असल्याने आणि संघटन नसल्याने भाजपला मोठी झेप घेता आली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रबळ उमेदवारांना भाजपशी जमवून घ्यावे लागले. दोन सदस्यांचा प्रभाग झाल्यास प्रबळ उमेदवार आपल्या जोडीदारालाही पुढे नेईल, असा आघाडी नेत्यांचा अंदाज आहे. भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मते “प्रभाग पद्धत कोणतीही आणली तरी परिणाम होणार नाही. भाजपने जनमानसावरील पकड घट्ट केली आहे.’

 

शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस सरकारने चार सदस्यांचा प्रभाग ही पद्धत मोडीत काढण्याचे ठरवले आहे. महापालिकेतील भाजपची सदस्य संख्या कमी करण्याचा हेतू आघाडीमधील घटक पक्षांचा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार “महापालिकेची आगामी निवडणूक दोन सदस्यांचा एक प्रभाग या धर्तीवर होणार आहे.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.