महाबळेश्‍वरातल्या अधिकाऱ्यांना झालंय तरी काय? 

खा. उदयनराजेंनी व्यक्त केला संताप : “स्थानिकांवर कारवाई अन्‌ धनिकांची पाठराखण’

महाबळेश्‍वर – नियम, कायद्याच्या अटी यासह अनेक बाबींच्या नावाखाली स्थानिकांवर कारवाई करणारे अधिकारी धनिकांसाठी मात्र पायघड्या घालत आहेत. त्यांनी केलेल्या नियमबाह्य गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच धनिकांविरोधात तक्रार केल्यास “बघू, करु’ अशी उडवाउडवीची उत्तरे पालिका अधिकारी देत असल्याने या अधिकाऱ्यांना नेमकं झालय तरी काय? अशा शेलक्‍या शब्दात खा. उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.

राज्यात मध उत्पादनात अग्रेसर असलेली मधुसागर ही एकमेव सहकारी संस्था असून या संस्थेच्यावतीने सेंद्रिय मध उद्‌घाटन सोहळा व सभासद विमा संरक्षण या योजनांचा संयुक्त कार्यक्रम आ. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर खा उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला. यावेळी उदयनराजे बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य बाळासाहेब भिलारे, मधुसागरचे अध्यक्ष संजयबाबा गायकवाड, सभापती रूपाली राजपुरे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, माजी नगराध्यक्ष किसनराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. स्थानिकांवर कारवाईचा बडगा आणि धनिकांच्या विनापरवाना बांधकामाकडे दुर्लक्ष अशी येथील पालिका अधिकारी यांची पक्षपाती भूमिका घेत असल्याने खा. उदयनराजे भोसले यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त करून येथील अधिकारी यांना “झालयं तरी काय’ असा संतप्त सवाल उपस्थित केला.

गावठाण विस्तार, चटई क्षेत्रात वाढ, बेघरांची समस्या असे स्थानिकांचे अनेक प्रश्‍न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. यामध्ये आता हरीत लावादाचे भूत महाबळेश्‍वर तालुक्‍याच्या मानगुटीवर बसविण्यात आले आहे. हे सर्व प्रश्‍न एका वर्षाच्या आत मार्गी लावण्यासाठी आपण आ. मकरंद पाटील यांच्या बरोबर प्रयत्न करू, असे आश्‍वासन खा. भोसले यांनी यावेळी बोलताना दिले. एका बाजुला पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी आपण प्रयत्न करीत असतो, शासन जाहिरात करीत असते, वाढलेल्या पर्यटकांच्या सोईसाठी स्थानिकांनी काही केले तर लगेच त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र धनिकांना पायघड्या घातल्या जातात.

यामध्ये आता बदल झाला पाहिजे, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. आ. मकरंद पाटील यांनी आपल्या भाषणात मधुसागर या संस्थेने राबविलेल्या योजनांचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष संजयबाबा गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष अशोक भिलारे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी यांच्यावतीने खा. उदयनराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी खादी ग्रामोद्योगचे संचालक डी. आर. पाटील, वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड, पंचायत समितीच्या उपसभापती अंजना कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दत्तात्रय वाडकर, युवा शहर अध्यक्ष रोहित ढेबे, माजी नगराध्यक्ष युसूफ शेख, माजी सभापती ऍड. संजय जंगम. राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाबुराव सपकाळ, मनिष भंडारी, संजय उतेकर, सुभाष कारंडे, विशाल तोष्णीवाल, संजय पारठे, प्रशांत आखाडे, चंद्रकांत आखाडे, संदीप मोरे, बापु शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.