मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारकडून करात कपात करत काहीसा दिलासा देण्यात आला होता. याशिवाय, सर्वच राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करण्याचे आवाहन केंद्र सरकारने त्यावेळी केले होते. मात्र, त्यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने केंद्राकडून निधीच मिळत नसल्याचे कारण देत नकार दिला होता.
यानिर्णयानंतर राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी ट्वीट करत आपला पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हाच व्हिडीओ कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी पुन्हा शेअर करत राज्यात विरोधी पक्षात असताना इंधन कर कपातीची मागणी करणाऱ्या भाजपला त्यांच्या जुन्या मागणीची आठवण करून दिली आहे.
ट्वीटद्वारे सचिन सावंत म्हणाले, शिंदे सरकारने पेट्रोल करात 5 रुपये आणि डिझेल करात 3 रुपयांनी कपात केली आहे, याचे आश्चर्य वाटते. महाविकास आघाडी सरकारकडे एकूण व्हॅटवर 50 टक्के कपात करा म्हणजे एकूण पेट्रोलवरील 32.55 पैकी 16.28 रुपये आणि डिझेलवरील 22.37 रुपयांपैकी 11.19 रुपये कमी करा, अशी भाजपची मागणी होती, त्याचे काय झाले असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. सावंत यांनी ट्वीट करताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केला आहे.
महत्वाची बातमी : प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
सचिन सावंत यांनी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील त्यांच्या जुन्या आरोपांची आठवण करून दिली आहे. केंद्रीय कराएवढे राज्याचे कर असावेत व राज्याचा कर केंद्रापेक्षा 10 रुपयांनी जास्त असल्याने महाविकास आघाडीमुळे महागाई वाढत आहे, असा आरोप फडणवीस करत होते. अजूनही केंद्रापेक्षा जास्त महाराष्ट्राचा कर आहेच. त्याचे काय असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. राज्यात कर कपात केल्यानंतरही गुजरात आणि कर्नाटकमधील दर कमी असल्याची आठवणही सावंत यांनी करून दिली आहे.
आज शिंदे फडणवीस सरकारने पेट्रोल व डिझेल दरांमध्ये अनुक्रमे ₹५ आणि ₹३ एवढीच कपात केली याचे आश्चर्य वाटते. मविआ सरकारकडे एकूण वॅटवर ५०% कपात करा म्हणजे एकूण पेट्रोल वरील ₹३२.५५ पैकी ₹१६.२८ व डिझेल वरील ₹२२.३७ पैकी ₹११.१९ कमी करा अशी भाजपाची मागणी होती. त्याचे काय झाले? pic.twitter.com/Ajk4ToFone
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 14, 2022