निर्भयाचं काय झालं?

 

“निर्भया’ म्हटलं की आजही तो काळा दिवस आठवतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील ‘त्या’ अमानवी कृत्याने संपूर्ण देशात संतापाची त्सुनामी आली होती. लोकांमध्ये असलेली प्रचंड चीड आणि एकवटण्याची ताकद पाहून आता देशात पुन्हा महिलांविरोधात बलात्कार, छेडछाड यांसारखे गुन्हे घडणारच नाहीत असं वाटलं होतं.परंतु प्रत्यक्षात बलात्काराच्या घटना कधीच थांबल्या नाहीत मात्र लोकांच्या भावना नक्कीच बोथट झाल्या… 

नुकत्याच लोकसभा निवडणूका पार पडल्या आणि निकालही जाहीर झाले. विरोधी पक्षांनी सरकारला खेचण्याचा प्रयत्न केला तर सत्ताधाऱ्यांनी विरोधांच्या चुका काढल्या. अनेक मुद्‌द्‌यांवर निवडणूक लढवली गेली. यामध्ये रोजगार, शिक्षण, शेतकरी आत्महत्या, महागाई, राफेल, बालाकोट एअर स्ट्राईक, हे मुद्दे चांगलेच चर्चेत आले. परंतु निवडणुकांची धामधुम सुरु असतानाच एक अशी पत्रकार परिषद झाली ज्यामध्ये थेट सत्ताधारी, विरोधक आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्‍न चिन्ह निर्माण करण्यात आले. हि पत्रकार परिषद घेतली निर्भयाच्या जन्मदात्यांनी! तीच निर्भया जिच्यावर 16 डिसेंबर 2012 रोजी सहा जणांनी चालत्या बसमध्ये हल्ला केला व तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. नंतर तेरा दिवसांनी तिचा मृत्यू झाला. या घटनेला 7 वर्ष पूर्ण होत आहेत तरी निर्भयाला न्याय मिळाला नसल्याचे तिच्या आई-वडिलांनी म्हंटले आहे.

लोकसभा निवडणुकीत आम्हाला मतदान करण्याची इच्छा नसल्याचे निर्भयाचे आई वडील म्हणाले होते. कोणाच्या मनावर एवढा परिणाम होणे साहजिक आहे. कारण न्याय मिळण्यापासून ते आजही वंचित आहेत. तसेच राजकीय पक्षांनी स्वतःच्या हितासाठी दाखवलेली खोटी सहानुभूती देखील त्यांना नको आहे. त्यामुळे नक्कीच प्रश्‍न निर्माण होतो की गुन्हेगारांना सांभाळणे किती योग्य आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे विखुरलेली आपली व्यवस्था पीडितांना न्याय देऊ शकत नाही. निर्भयाचे आई-वडील म्हणतात “अनेक राजकीय पक्षांनी आम्हाला न्याय देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र आता आम्ही थकलो असून राजकीय पक्षांकडून दाखवली जाणारी सहानुभूती आणि आश्‍वासन केवळ राजकीय नाट्य आहे. कारण गुन्हेगार आजपर्यंत जिवंत आहेत. सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कोणतीच ठोस पाऊले उचलली नाहीत”.

निर्भयाच्या आई आशा देवी म्हणाल्या, देश अजूनही असुरक्षित आहे. आई-वडील आपली मुलगी घरी येईपर्यंत चिंतेत असतात. लोकांचा व्यवस्थेवर विश्‍वास नाही. यावेळी मला कोणत्याच पक्षाला मतदान करण्याची इच्छा नसून माझ्या मुलीवर दुष्कर्म होऊन आणि तिची हत्या होऊन 7 वर्षे झाली. मात्र गुन्हेगारांना आतापर्यंत शिक्षा झाली नाही. निर्भयाचे वडील म्हणाले, सर्व राजकीय पक्ष महिलांचा सन्मान आणि सशक्तिकरणाच्या गप्पा मारतात. मात्र त्यांच्या जवळ यावर कोणत्याच ठोस उपाय-योजना नाहीत. तसेच 2013च्या बजेटमध्ये घोषित करण्यात आलेल्या निर्भया निधीचा योग्य प्रकारे वापर करण्यात आला नसल्याचे बद्रीनाथ सिंह म्हणाले. वरील भूमिका फक्त निर्भयाच्या आई-वडिलांची आहे असे नाही, तर आज देशात अनेक पीडितांच्या आई-वडिलांची आहे जे आजही न्याय मिळण्याची वाट पाहत आहेत.

‘देशातील बलात्काराच्या वाढत्या घटना लक्षात घेता बलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती करणाऱ्यांना जरब बसावी, यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्‍यकच होते. त्यानुसार, संसदेने भारतीय दंड संहितेत मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद करणारे नव्याने आणलेले कलम (ई) हे योग्यच आहे’, मात्र अंमलबजावणीच काय? हे कलम आणून देखील छेडछाड, बलात्कारासारखे गुन्हे कमी होताना दिसत नाहीत. याउलट अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसत असून नुकतीच राजस्थानातील अलवर येथे झालेली सामूहिक बलात्काराची घटना देशातील व्यवस्थेला आरसा दाखवणारी आहे. अलवर येथील बलात्काराच्या घटनेनंतर  देखील निर्भया प्रकरणाप्रमाणे त्याचे जोरदार राजकारण करण्यात आले. एकमेकांवर चिखलफेक, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून पीडितेच्या गाठीभेटी, न्याय मिळवून देण्याचे आश्वासन असे सगळे सोपस्कार पार पडले असून आता केवळ न्यायाची अविरत प्रतीक्षा सुरु आहे.

 

 

 

-संदीप कापडे 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)