दिल्लीत आज काय काय घडले?

18 एफआयआर तर 106 जणांना अटक

नवी दिल्ली : दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचार प्रकरणी 18 एफआयआर नोंदवण्यात आले. तर 106 समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी बुधवारी दिली. दरम्यान तत्पुर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीची माहिती दिली.

काही बाहेरचे, समाज कंटक आणि काही राजकारणी या हिंसाचारास कारणीभूत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. ईशान्य दिल्लीतील मृतांची संख्या 23वर पोहोचली असून दंगलग्रस्तांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू करण्याचे आणि जखमींना मदत देण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांचा वापर करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायलयाने दिले.

उच्च न्यायलयात दिल्लीतील हिंसाचाराबाबत सुनावणी सुरू असल्याने सर्वोच्च न्यायालयाने शाहीनबाग प्रकरणाची सुनावणी 23 मार्चपर्यंत स्थगित ठेवली. दिल्लीतील हिंसाचारबाबत चर्चा करण्यासाठी अखिलेश यादव, सीताराम येचुरी आणि शरद यादव यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीची वेळ मागितली.

दरम्यान दिल्ली पोलिसांनी बुधवारी शहरातील परिस्थितीची माहिती पत्रकारांना दिली. या प्रकरणात 106 समाजकंटकांना अटक करण्यात आलीअसून 18 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. बुधवारी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मदतीसाठी येणाऱ्या फोनच्या संख्येतही घट झाली आहे. हिंसाचारग्रस्त भागातील नागरिकांसाठी दोन हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहेत, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईशान्य दिल्लीच्या पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयात जाऊन माहिती घेतली.

दिल्लीत 2002चे गुजरात मॉडेल
दिल्लीत घडलेल्या घटना पाहता 2002 चे गुजरात मॉडेल वापरले असण्याची शक्‍यता वाटत आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसने व्यक्त केले. या मुद्यावर या पक्षाने केंद्र सरकारवर हल्ला बोल केला. सर्वोच्च न्यायलय बार असोसिएशनशने या प्रश्‍नावर चिंता व्यक्त केली.

कॉंग्रसच्यावतीने बुधवारी शांतता फेरी काढण्यात आली. या फेरीत प्रियांका गांधी सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासह मुकुल वासनिक, केसी वेणुगोपाल, पीएल पन्निया, रणदीप सुरजेवाला यांनी या फेरीत सहभाग नोंदवला.

या हिंसाचारत मरण पावलेल्यांची संख्या 23वर पोहोचली आहे. गुरू तेजबहादूर रुग्णालयात 22 जण तर लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात एक जण मरण पावला.

दिल्लीतील हिंसाचारामुळे सीबीएससी बोर्डाने 26 फेब्रुवारीचे पेपर पुढे ढकलले. मात्र अन्य पेपर नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.