गांधीजींचे विचार खरोखर काय होते?

गांधीजींना समजावून घेण्यासाठी खरं तर त्यांनी लिहिलेले विचार आपण वाचायला हवेत. त्यांच्या लिखाणाचे शंभर खंड प्रसिद्ध आहेत. त्यांची पाने पंचावन्न हजारांपेक्षा जास्त आहेत. ते लिखाण पाहिले तर कोणत्याही विषयावर त्यांचे काय म्हणणे आहे हे स्पष्टपणे कळते. इतके वाचन शक्‍य नसले तर त्यांच्या निवडक साहित्याचे संकलन करून “द माइंड ऑफ महात्मा गांधी’ नावाचे पुस्तक नवजीवन प्रकाशनने प्रकाशित केले आहे. या साधारण पाचशे पानांच्या पुस्तकात महत्त्वाच्या सर्व विषयांवरचे गांधीजींचे विचार संकलित केले आहेत.

गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाशी सत्य आणि अहिंसा या दोन संकल्पना कायमच्या जोडलेल्या आहेत. गांधीजींचं म्हणणं होतं की, जिथे सत्य आहे, तिथेच ईश्‍वर असतो. ईश्‍वर म्हणजे कुणी वेगळा नाही. सत्यालाच ईश्‍वर माना. तुमच्याजवळ सत्य असेल तर मग तुमच्याजवळ ईश्‍वरच आहे असं समजा. खरं तर सहिष्णुता हे भारतीय जीवनाचे शेकडो वर्षांचे वैशिष्ट्य आहे. या सहिष्णुतेचेच दुसरे नाव अहिंसा आहे. इंग्रजांना राज्य चालवण्यासाठी भारतातील कोट्यवधी जनतेचे सहकार्य असणे आवश्‍यक होते. ते गांधीजींनी नाकारले. सरकारशी असहकार करणे, निर्भयतापूर्वक नाही म्हणणे आणि त्याचे परिणाम शांतपणे भोगणे ही त्यांच्या दृष्टीने अहिंसा होती. हिंसा हा आपला स्वधर्म असू शकत नाही असे त्यांचे ठाम मत होते.

आत्मसंरक्षण हा आपला नैसर्गिक धर्म आणि मानवी हक्‍क आहे, हे त्यांना मान्य होते. गांधीजींचे म्हणणे होते की, दुसऱ्याचे कोणत्याही पद्धतीने केलेले शोषण म्हणजे हिंसा. दुसऱ्याला फसवणे, श्रमाचा योग्य मोबदला न देणे, व्यापारात लबाडी करणे, कारखान्यांचे सांडपाणी सोडून नद्या प्रदूषित करणे, झाडांची वारेमाप तोडणी करणे ही हिंसा आहे. दुसऱ्याशी सौजन्याने न वागणे हीसुद्धा हिंसाच आहे. आपल्या जीवन व्यवहारातून अशा प्रकारची हिंसा दूर करणे ही गांधीजींची आयुष्यभराची तळमळ होती. मात्र, त्याच वेळी अन्याय सहन करणार नाही, हे आत्मिक बल त्यांनी भारतीय जनतेमध्ये निर्माण केले.

इंग्रजांचे वर्चस्व झुगारून देतानाच वसाहतवादी मनोवृत्तीही त्यांना झुगारून द्यायची होती. भारतीयांमध्ये ती रुजू नये अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच स्वातंत्र्य मिळाल्यावर दिल्लीतील व्हॉइसरॉय भवनचे रूपांतर एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये करावे असे त्यांचे म्हणणे होते, पण आपण ते ऐकले नाही. प्रासादासारख्या त्या भव्य वास्तूचे रूपांतर आपण राष्ट्रपती भवनमधे केले. त्याऐवजी त्याचे हॉस्पिटल केले असते तर सर्वसामान्य जनतेची गरज भागवण्याचे व्यापक उद्दिष्ट साध्य झाले असते. पण आपली गुलामी मनोवृत्ती गेलीच नाही. आपला देश आहे, आपली जनता आहे. आपण इंग्रजांप्रमाणे डामडौलात साहेबी पद्धतीने राहू नये हे गांधीजींचे सांगणे आपण कानाआड केले.

गांधीजींच्या स्वप्नातला भारत हा खेड्यांमध्ये वसलेला भारत होता. या गावाचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. या खेड्यात लहान लहान उद्योगधंदे असणार होते. गोठा भरलेला असावा अशी त्यांची अपेक्षा होती. या गावाची स्वतःची अशी एक शिस्त असायला हवी. स्वावलंबी, निर्मळ असे हे गाव असायला हवे. आपले गाव म्हणजे एक कुटुंब असे इथल्या ग्रामस्थांनी मानावे आणि निसर्ग, पर्यावरण यांच्याशी त्यांचा प्रेमभाव असावा अशी गांधीजींची भारतातील खेड्यांविषयी कल्पना होती. अशा प्रकारची गावे आता प्रगत देशातले लोक पसंत करू लागले आहेत. अमेरिकेमधे बहुसंख्य लोक लहान, टुमदार गावांमधे राहतात. ती स्वयंपूर्ण असतात व तिथले पर्यावरण तर निसर्गरम्य असतेच पण ते स्वतःचा कारभार स्वयंशिस्तीने आणि सभ्यपणाने चालवत असतात. त्यांचे जीवन स्वास्थ्यपूर्ण असते. गांधीजींची ग्रामस्वराज्याची कल्पना ही खरे तर अमेरिकेमधल्या लहान गावांनीच साकार केली आहे. याउलट आपण मात्र “भकास खेडी आणि बकाल शहरे’ हा विकासाचा मार्ग स्वीकारलेला आहे.

गांधीजींनी अकरा तत्त्वांचा नेहमी पुरस्कार केला. 1. अहिंसा, 2. सत्य, 3. अस्तेय, 4. ब्रह्मचर्य, 5. असंग्रह, 6. शरीरश्रम, 7. अस्वाद, 8. भयवर्जन, 9. सर्वधर्म समानता, 10. स्वदेशी, 11. अस्पृश्‍यनिवारण. शरीरश्रमास प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी गांधीजींनी त्याचा पुरस्कार केला. त्यांना स्वच्छ दिसत होते की, भारतीयांची विभागणी सरळसरळ दोन वर्गांमधे झाली आहे. शरीरश्रम करणारे आणि न करणारे. वर्णव्यवस्थेमुळे आणि इंग्रजी शिक्षणामुळे कष्ट करणाऱ्यांना दुय्यम स्थान मिळत होते. अर्थात इथेही इंग्रज स्वतः शारीरिक कष्ट करण्यात कधीच कमीपणा समजत नसत. आपण मात्र तसे मानू लागलो.

एकंदरीत गांधीजींनी आपल्या देशाबाबत, भारतीय मानसिकतेबद्दल पुष्कळ विचार केला होता. भारत देश स्वास्थ्यपूर्ण होण्यासाठी काय करायला हवे, कोणत्या मूल्यांची रुजवण करायला हवी हे ते पूर्णपणे ओळखून होते आणि म्हणून वर लिहिलेल्या अकरा मूल्यांचा त्यांनी सातत्याने पुरस्कार केला. गांधीजींचे खरोखरीचे विचार काय होते हे जाणून ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न करणे हेच खरे गांधीजींचे स्मरण ठेवण्यासारखे आहे.

माधुरी तळवलकर

Leave A Reply

Your email address will not be published.